नाशिक : पाच वर्षांपूर्वी हायटेक नवनिर्माणाचे स्वप्न दाखवत महापालिकेत सत्तेवर आलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी आता नवनिर्माणाच्या दुसऱ्या पर्वात ‘नवनिर्माणावर बोलू काही...’ असे म्हणत पुन्हा एकदा सत्तेची मैफल जमविण्याची तयारी चालविली आहे. लोकांच्या अपेक्षा वाढवून ठेवल्या की काय होते, याचा अनुभव गाठिशी असल्याने राज यांनी पुन्हा नवनिर्माणाचा संकल्प सोडताना ‘शब्द’ मात्र जपून वापरले आहेत. ‘विकासनामा’ अथवा ‘वचननामा’ या गुळगुळीत शब्दांना बाजूला ठेवत राज यांनी येत्या पाच वर्षांत काही संकल्पना साकारण्याचा शब्द दिला असला तरी त्यात नवे असे काही नसल्याने ‘शब्दांमधून ओघळले काही, त्यात नवे काहीच नाही’ असेच म्हणण्याची वेळ नाशिककरांवर आली आहे. महापालिका निवडणुकीचा प्रचार संपायला अवघे दोन दिवस उरले असताना मनसेने नवनिर्माणाच्या दुसऱ्या पर्वाचा संकल्प प्रकाशित केला. हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर झालेल्या जाहीर सभेत राज ठाकरे यांच्या उपस्थितीत त्याचे प्रकाशन झाले. ‘माझा शब्द’ या शीर्षकाखाली नाशिकच्या नवनिर्माणाच्या दुसऱ्या पर्वात नेमके काय असेल, याची झलक त्यात दाखविण्यात आली आहे. पाच वर्षांपूर्वी विकासाची ब्ल्यू प्रिंट समोर ठेवत नवनिर्माणाचे स्वप्न दाखविणाऱ्या मनसेने आता मात्र स्वप्न दाखविताना हात आखडता घेतला आहे. त्यात बहुतांशी संकल्पना या जुन्याच असून, काही संकल्पना महापालिकेत यापूर्वीच राबविण्यात आल्या आहेत अथवा राबविण्यात येत आहेत. गेल्या पाच वर्षांत शहर बससेवा चालविण्यास अनुत्सुक असलेल्या मनसेने आता मात्र ‘शब्द’ फिरविला असून, महापालिकेची बससेवा सुरू करण्याचे वचन दिले आहे. (प्रतिनिधी)
पुन्हा नवनिर्माणावर बोलू काही !
By admin | Published: February 18, 2017 2:07 AM