मुंबई : मुंबईकरांना मोकळा श्वास घेण्यासाठी उद्याने ही उपयुक्त असून शासन आणि मुंबई महापालिकेच्या संयुक्त प्रयत्नातून हरित मुंबई तयार करुया, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.महापालिकेतर्फे दादर येथील प्रमोद महाजन कला पार्कचे उद्घाटन रविवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले; यावेळी ते बोलत होते.देवेंद्र फडणवीस म्हणाले, प्रमोद महाजन यांनी राजकारणाला एक वेगळी दिशा देण्याचे काम केले. टेलिकम्युनिकेशन क्रांतीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता.भाजीवाला, रिक्षावाल्याकडे ज्या दिवशी भ्रमणध्वनी असेल तो दिवस सुदिन असल्याचे त्यांचे मत होते. सूक्ष्म नियोजनामध्ये त्यांची हातोटी होती. परिपूर्णतेमध्ये त्यांनी तडजोड केली नाही. गुणवत्तेचे अत्युच्च शिखर त्यांच्यामध्ये पहायला मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. शहराच्या महापौर स्नेहल आंबेकर म्हणाल्या, उदंचन केंद्राच्या जागी उद्यानाची कल्पना ही अप्रतिम असून उद्यानात २५ हजार ९०० चौरस मीटरवर १४० प्रजातींची १ लाखांहून अधिक शोभिवंत फुलझाडे व झुडपे आहेत. भविष्यात ३० ते ३२ उद्यानांचा विकास होणार असून आजपासून त्या प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे.उद्योगमंत्री व मुंबई शहराचे पालकमंत्री सुभाष देसाई, मुंबई भाजपचे अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार, खासदार राहुल शेवाळे, खासदार पूनम महाजन, आमदार सदा सरवणकर, राज पुरोहित, पराग अळवणी, मनीषा चौधरी, तमिळ सेल्वन, देवयानी फरांदे, उप महापौर अलका केरकर, महापालिका आयुक्त अजय मेहता आणि रेखा महाजन तसेच अनेक नागरिक या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
हरित मुंबईसाठी प्रयत्न करू या!
By admin | Published: May 04, 2015 2:01 AM