"शिवरायांचा अवमान करणाऱ्या विचारांचा टकमक टोकावरून कडेलोट करू’’, काँग्रेसचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 19:04 IST2025-02-27T19:03:11+5:302025-02-27T19:04:14+5:30
Harshwardhan Sapkal News: छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या मंडळींच्या मागे राजाश्रय आहे म्हणूनच महाराजांचा अवमान करणाऱ्यांना संरक्षण व पुरस्कार दिले जात आहेत ही अत्यंत खेदाची बाब असून, शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या विचारांचा टकमक टोकावरून कडेलोट करू, असा आमचा संकल्प असल्याचा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला.

"शिवरायांचा अवमान करणाऱ्या विचारांचा टकमक टोकावरून कडेलोट करू’’, काँग्रेसचा इशारा
रायगड/ मुंबई - हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांना राज्याभिषेक नाकारणारे, त्यांच्याबद्दल अपप्रचार करणाऱ्या विचारांची मंडळी आज केंद्र आणि राज्यात सत्तेत आहेत. शिवाजी महाराजांना छळले तो विचार आजही जिवंत आहे. शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या मंडळींच्या मागे राजाश्रय आहे म्हणूनच महाराजांचा अवमान करणाऱ्यांना संरक्षण व पुरस्कार दिले जात आहेत ही अत्यंत खेदाची बाब असून, शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या विचारांचा टकमक टोकावरून कडेलोट करू, असा आमचा संकल्प असल्याचा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज रायगड किल्ल्यावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले आणि त्यानंतर महाडच्या चवदार तळ्याला भेट देऊन महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले, त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते पुढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ अदिलशाही, निजामशाहीच नाहीतर भेदाभेद, अस्पृषता व असमाजवादी विचार घेऊन काम करणाऱ्यांच्या विरोधातही लढले. अदिलशाही, निजामशाही, औरंगजेब गेला पण जातीयवादाचा विचार मात्र गेला नाही तो आजही कायम आहे. एका अभिनेत्याने शिवाजी महाराजांचा अपमान केला पण त्याच्यावर कारवाई न करता त्याच्या घरासमोर पोलीस पहारा देत बसले आहेत. इतिहास तज्ज्ञ इंद्रजीत सावंत यांनी फोनवरून धमकी दिली जाते व त्याचवेळी महाराजांच्याबद्दल अपशब्द वापरले जातात. शिवाजी महाराज व संभाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या सावरकरांना सरकार पुरस्कार देऊन सन्मानित करते हे दुर्दैवी आहे, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
स्वातंत्र्य चळवळीतही केवळ सत्तेचे हस्तांतर नव्हे तर व्यवस्था परिवर्तनाचे स्वप्नही होते आणि स्वातंत्र्यानंतर देशाला दिलेल्या संविधानातही हिंदवी स्वराज्याची संकल्पना आहे.काँग्रेसची ध्येय धोरणही हिंदवी स्वराज्यावर आधारीत आहेत. महाराजांना अपेक्षित असणारे रयतेचे राज्य स्वराज्य स्थापन करण्याकरता काँग्रेस पक्ष बांधिल असल्याचे सांगताना ही प्रतिज्ञा करण्यासाठी रायगडावर आलो आहे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.
पुण्यातील बलात्कार प्रकरणावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ म्हणाले की, महिलांवरील बलात्कार हे सरकारचे अपयश आहे. घाशीराम कोतवालाच्या हातात गृह विभागाचा कारभार आहे याचे हे द्योतक आहे. छत्रपतींनी पेशव्यांना गादीवर बसवले आणि पेशव्यांनी स्वराज्याची वाट लावली, आज तसेच होत आहे का ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.