मुंबई : ‘महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण देशाला हेवा वाटेल, अशा स्वरूपाची रचना असलेले मराठी भाषा भवन व्हावे. मराठी भाषेला असलेला दोन हजार वर्षांचा इतिहास यातून मिळावा. येणाऱ्या पिढ्यांना मराठीची थोरवी समजावी, या हेतूने संकल्पित मराठी भाषा भवन वास्तू असली पाहिजे’, अशी अपेक्षा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.
विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गुरुवारी विधानभवनात बोलाविलेल्या विशेष बैठकीत उद्धव यांनी मार्गदर्शन केले. ठाकरे म्हणाले, ‘सर्व मराठी भाषिक नागरिकांना मुंबईत आल्यावर या वास्तूला भेट द्यावी, अशा पद्धतीने याची रचना हवी. आपल्या मातृभाषेसाठी एकत्र काम करू या’, असे आवाहन उद्धव यांनी केले.
सर्वांच्या सूचना स्वागतार्ह असल्याचे मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. दरम्यान, सर्व पक्षीय राजकारण बाजूला ठेवून मातृभाषेला पाठिंबा दिला पाहिजे, असे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या.