पुणे : फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडियाच्या (एफटीआयआय) संचालकांच्या नावाने शनिवारी दुपारी ‘लेटर बॉम्ब’ आल्यामुळे एकच खळबळ उडाली. थेट दिल्लीहून पोस्टाद्वारे आलेल्या एका पार्सलमध्ये डिटोनेटर, स्फोटक पावडरसोबत धमकी देणारे पत्र आल्यामुळे पोलिसांचीही धावपळ उडाली आहे.‘तुम्ही कन्हैयाला पाठिंबा दिला. त्यामुळे आम्ही हाय एक्स्प्लोजिव्ह पाठवत आहोत,’ असे पत्रात नमूद केले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी साडेतीनच्या सुमारास पोस्टाद्वारे दिल्लीचा पत्ता असलेले २ पाकिटांचे पार्सल मिळाले. संध्याकाळी हे पार्सल उघडण्यात आले. मोठ्या पाकिटामध्ये एक पत्र होते. त्यावर कन्हैयाला पाठिंबा दिल्यामुळे स्फोटके पाठवत असल्याचे म्हटले होते. दुसऱ्या पाकिटात एक डिटोनेटर आणि पावडर होती. ही पावडर नायट्रो ग्लिसरीन असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. ही स्फोटके न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे तपासणी करता पाठविण्यात येणार आहेत.माझ्या नावाने आलेल्या पाकिटामध्ये काही आक्षेपार्ह साहित्य आणि धमकीचे पत्र होते़ ते वाचून आम्ही तातडीने एफटीआयआयचे सुरक्षारक्षक आणि स्थानिक पोलिसांना पाचारण केले. ते पाकीट पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, तपासणीचे काम सुरू आहे. गेल्या काही महिन्यांपासून एफटीआयमधील वातावरण शांत आहे. विद्यार्थ्यांचा अभ्यास, प्रवेशाची प्रक्रिया, अभ्यासक्रम सर्व सुरळीत सुरू आहे. त्यामुळे या घटनेचा जुन्या घटनांशी संबंध जोडणे योग्य ठरणार नाही.- भूपेंद्र कँथोला, संचालक, एफटीआयआय
एफटीआयआयमध्ये ‘लेटर बॉम्ब’
By admin | Published: May 08, 2016 3:33 AM