नागपूर, दि. 21 : पावसाने हुलकावणी दिल्यामुळे संकटात सापडलेल्या बळीराजाच्या नावावर राजकारण तापण्याची चिन्हे आहेत. विदर्भ, मराठवाड्यातील शेतक-यांना कमी पावसाचा फटका बसलेला आहे. पीक नुकसानासाठी राज्य शासनाने आर्थिक मोबदला जाहीर करावा, अशी मागणी शिवसेनेतर्फे करण्यात आली आहे. राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीले असून येत्या मंत्रीमंडळ बैठकीत यावर चर्चा करण्याची मागणी केली आहे.
विदर्भाचे संपर्क प्रमुख म्हणून जबाबदारी सोपविण्यात आल्यानंतर दिवाकर रावते यांनी सोमवारी पक्ष पदाधिका-यांशी रविभवन येथे चर्चा केली. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यंदा पाऊस कमी आल्यामुळे अगोदरच अडचणीत असलेल्या शेतक-यांचे कंबरडे मोडले आहे. सोयाबीन, मूग, उडीद या पिकांचे फार नुकसान झाले आहे. कापूस आणि काही प्रमाणात तूरीचे उत्पादन होईल. कर्जमाफी झाल्यानंतरदेखील विदर्भात शेतकरी आत्महत्या होत आहेत. त्यातच शेतकºयांना कर्जमाफी वेळेवर पोहोचू शकलो नाही. अगोदरचे कर्ज न भरल्याने नवे कर्ज मिळालेले नाही. अशा स्थितीत अस्मानी संकटामुळे गेलेल्या पिकाला आर्थिक मदत मिळावी ही शिवसेनेची भुमिका आहे. याबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशीदेखील चर्चा झाली आहे, असे रावते यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांना शेतक-यांच्या एकूण स्थितीचा पिकनिहाय अहवाल सोपविण्यात आला आहे. मुख्यमंत्री याची नोंद घेतील व मंत्रीमंडळ बैठकीत काही ना काही निर्णय घेतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.यापुढे शिवसेना स्वबळावरच लढणारमीरा-भाईंदर महानगरपालिका निवडणूकांत शिवसेनेला यश मिळाले नाही. पराभवाच्या कारणांबाबत विचारणा केली असता त्यांनी त्यावर बोलण्यास नकार दिला. तेथील जनतेने दिलेला कौल निकालांतून समोर आला आहे. आपल्या देशात निवडणूका होतच असतात. निवडणूका ही जीवनशैलीच आहे. निवडणूका डोळ््यासमोर ठेवून आम्ही काम करत नाही. मात्र यापुढे शिवसेना स्वबळावरच लढणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. पानीपत झाल्यानंतर मराठे पुन्हा उठले आणि देश पादाक्रांत केला. तशी शिवसेना पुन्हा उभारी घेईल या शब्दातं त्यांनी भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांनी ह्यटिष्ट्वटरह्णवरुन केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले.