मुंबई : एकतर कर्जमाफी द्या किंवा आत्मदहनास परवानगी द्या, असे पत्र पोपट सोपान जगताप या मराठा शेतकºयाने मुख्यमंत्री व पशुसंवर्धनमंत्र्यांना लिहिले आहे. मराठा क्रांती ठोक मोर्चाने पुकारलेल्या बेमुदत उपोषण आंदोलनात जगताप सामील झाले आहेत.२०१२-१३ ला घेतलेले कर्ज दरवर्षी जुने केले जात असल्याने शेतीसाठी पैसा उपलब्ध होत नसल्याची खंत जगताप यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. ते म्हणाले, पीक कर्ज नवे-जुने केल्यामुळे माफ होत नाही. नैसर्गिक आपत्तीमुळे पीक उद्ध्वस्त झाल्यानंतरही कर्जमाफीऐवजी सरकार फक्त कर्ज प्रकरण नूतनीकरण करत आहे. मराठा असल्यामुळे कोणत्याही योजनेचा लाभ मिळत नसल्याचा दावाही जगताप यांनी केला आहे. परिणामी, सावकाराकडून कर्ज घेतल्याने आता त्रासाला सामोरे जावे लागत आहे. कर्ज माफ करू शकत नसाल, तर आत्मदहनाची परवागनी द्यावी, असे पत्र त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिले आहे.दरम्यान, मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांचे उपोषण सलग दुसºया दिवशी सुरूच आहे. या आंदोलनाला राष्ट्रवादीचे आमदार प्रदीप नाईक यांनी आझाद मैदानात येत पाठिंबा घोषित केला. ३० नोव्हेंबरपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागला नाही, तर आंदोलनाचा इशारा नाईक यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिला आहे.
कर्जमाफी द्या किंवा आत्मदहनास परवानगी द्या!; मराठा शेतकऱ्याचे मुख्यमंत्र्यांना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2018 3:04 AM