मुंबई : महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेवर (एमएमसी) रजिस्ट्रार म्हणून आयुर्वेद डॉक्टरची नेमणूक आणि एमएमसीच्या निवडणुका न घेतल्या संदर्भात, इंडियन मेडिकल असोसिएशनने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. आयुर्वेदिक डॉक्टरांना अॅलोपॅथीची प्रॅक्टिस करू देऊ नये, म्हणून अॅलोपॅथी डॉक्टर न्यायालयात गेले आहेत, तरीही आयुर्वेदिक डॉक्टरची एमएमसीचा रजिस्ट्रार म्हणून अचानक नेमणूक करण्यात आली. एमएमसीच्या सदस्यांना याची पूर्वकल्पनाही देण्यात आली नव्हती. सरकारने असा निर्णय का घेतला, याविषयी डॉक्टरांमध्ये सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. एमएमसी कार्यालयात रजिस्ट्रार हा पूर्ण वेळ असणे आवश्यक आहे, पण नेमणूक केलेली व्यक्ती ही पोद्दार रुग्णालयात सहायक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे आणि आयुर्वेद, युनानीच्या परिषदेवरदेखील रजिस्ट्रार म्हणून कार्यरत आहे. एमएमसीत सुमारे लाख डॉक्टरांची नोंदणी आहे. राज्यभरातून डॉक्टर एमएमसीत कामासाठी येत असतात. अशा वेळी रजिस्ट्रार येथे नसेल, तर डॉक्टरांचे काम होणार नाही, तसेच एमएमसीच्या निवडणुका फेब्रुवारी महिन्यात घेण्यात याव्या, यासाठी एमएमसीने पत्रव्यवहार केला होता. त्याला कोणतेही उत्तर राज्य सरकारने दिले नाही. अजूनही निवडणुका झालेल्या नाहीत, तरी या दोन्ही गंभीर प्रश्नांकडे लक्ष द्यावे, असे पत्रात नमूद करण्यात आल्याचे आयएमएचे अध्यक्ष डॉ. जयेश लेले यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
‘आयएमए’ने लिहिले मुख्यमंत्र्यांना पत्र
By admin | Published: June 26, 2016 4:14 AM