पुणे – राज्यातील राजकीय परिस्थिती पाहता सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये वेगळीच कुजबुज सुरू आहे. राज्यातील या घडामोडीत सर्वाधिक आमदार असतानाही भाजपाला उपमुख्यमंत्रिपदावर समाधान मानावे लागत आहे. त्यात आता सत्तेत शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस भागीदार आल्याने निष्ठावंत भाजपा कार्यकर्त्यांचे काय असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. त्याचबाबत भाजपाचे पुणे जिल्हा युवा मोर्चाचे सरचिटणीस नवनाथ पारखी यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. सध्या हे पत्र खूप व्हायरल होत आहे.
नवनाथ पारखी म्हणतात की, देवेंद्र फडणवीस हे खूप चांगल्याप्रकारे महाराष्ट्रात काम करतायेत. परंतु या सत्तानाट्यामुळे भाजपाशी एकनिष्ठ असलेल्या जुन्या कार्यकर्त्यावर यामुळे अन्याय झालेला आहे त्यामुळे मी त्यांना पत्र लिहिलं आहे. या ५ प्रश्नांची चर्चा महाराष्ट्रात रंगली आहे. मला खूप जणांचे फोन आले. अनेकांची ही भावना आहे. भारतीय राज्यघटनेत प्रत्येक पक्षाची विचारधारा, घटना आहे. कार्यकर्ता हा पक्षाचा कणा आहे. या कार्यकर्त्यांसाठी आपण काय कराल यासाठी मी साद घातली आहे. अजित पवार यांना सोबत घेत त्यांच्यासोबत बसलो त्यामुळे पुणे जिल्ह्यात भाजपाची ताकद वाढेल की राष्ट्रवादीची हा कळीचा मुद्दा वाटतो असं त्यांनी सांगितले.
तसेच देवेंद्र फडणवीस यांना पोस्टाने हे पत्र पाठवले आहे. फडणवीसांची वेळ मागितली आहे निश्चित संध्याकाळपर्यंत भेटीची वेळ मिळेल आणि त्यांच्याकडे या भावना व्यक्त करू. पुणे जिल्ह्यात खूप आमदार आहेत ज्यांच्याकडे आम्ही मार्गदर्शक म्हणून पाहतो. तुम्ही बारामतीच्या मोठ्या साहेबांची जिरवण्याच्या नादात कदाचित पक्षातील कार्यकर्त्यांची तर जिरणार नाही ना हा माझ्यासारख्या कार्यकर्त्यांच्या मनात प्रश्न आहे असंही नवनाथ पारखी यांनी म्हटलं.
काय आहेत ५ प्रश्न?
- अजित पवार आणि त्यांचे सहकारी यांना सत्तेत सामावून घेऊन राष्ट्रवादीची ताकद वाढेल की भाजपाची?
- आमच्यासारख्या हजारो कार्यकर्त्यांचे वाली आपण आहात मग आम्हाला ताकद देणे हे आपले काम नाही का?
- वेळ पडेल त्यावेळेस जेवणाची शिदोरीसोबत घेऊन आम्ही पक्षाचा प्रचार आणि प्रसार केला मग आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचे संघटनेत महत्त्व काय?
- मोठ्या साहेबांची जिरवण्याच्या नादात भाजपाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांची तर जिरणार नाही ना..?
- भाजपाचे मंत्रिपदाच्या शर्यतीतील सहकारी आमदारांचे काय? ज्यांनी आजवर पक्षासाठी खूप काही केलंय?
जमलं तर जरूर उत्तर द्या साहेब अशी विनंती या पत्राद्वारे नवनाथ पारखी यांनी केली आहे.