मुंबई, दि.8- दरवर्षी विविध आमिषे दाखवून भारतासह जगभरातील विविध देशांमध्ये मुलींची तस्करी होत असते. भारतातही हे प्रकार होत असतात. अशाच एका फूस लावून पळवून आणलेल्या मुलीची मुंबईत सूटका करण्यात आली. मुंबई पोलीस आणि आयजेएम म्हणजेच इंटरनॅशनल जस्टीस मिशनने तिला तस्करीच्या जाळ्यातून सोडवले. तवी (नाव बदललेले आहे) नावाच्या या मुलीने आपल्यावर ओढवलेल्या प्रसंगाची कहाणी सांगून तस्करीच्या जाळ्यातून सोडवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आभाराचे पत्र लिहिले आहे. पंतप्रधानांना धन्यवाद देऊन तिने त्यांच्यासाठी नारळी पौर्णिमेला राखीही पाठविली. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी हे पत्र पंतप्रधानांकडे सुपुर्द करुन तिने पाठविलेली राखीही पंतप्रधानांना बांधली.
मूळची कोलकात्याची असणाऱ्या तवीला आमिष दाखवून तिच्या मित्राने मुंबईमध्ये आणले. मुंबईत आणल्यावर तिची चक्क विक्री करुन तिला वेश्याव्यवसायात ढकलले. वेश्याव्यवसायामध्ये सहा वर्षे मला नरकयातना भोगाव्या लागल्या असे तिने पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रामध्ये म्हटले आहे, ''मला तेथे दररोज मारहाण होत असे, एखाद्या जनावरापेक्षाही माझे वाईट हाल होत असत, असे वाटे की मी वेश्यागृहातच मरून जाईन, पण आयजेएम व पोलिसांनी मला वाचवले व तेथून बाहेर काढले''. तिने या पत्रात लिहिले आहे, "आज मी एका कारखान्यामध्ये नोकरी करत असून एक सन्मानपूर्ण जीवन जगत आहे. यासाठी मी सरकार, आयजेएम आणि पोलिसांचे आभार मानते ." तुम्ही सर्व महिलांचे बंधू आहात. माझ्यासारख्या तस्करीला बळी पडलेल्या मुलींची सूटका तुम्ही करा असे लिहून तवीने पंतप्रधानांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छाही दिल्या.
सेक्स ट्रॅफिकिंग रोखण्यासाठी हॉटेल व्यावसायिकांचे प्रयत्नमुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये हॉटेल, लॉज यामध्ये देहविक्री होत असल्याच्या तक्रारी समोर येत असतात. परंतु त्यातून सूटका होण्याचे भाग्य सर्व मुलींना मिळेलच असे नाही. त्यामुळे एखादे संशयास्पद जोडपे हॉटेलमध्ये आले किंवा शरीरविक्रय होत असल्याची शंका आली तर काय करावे याची माहिती हॉटेल व्यावसायीक आपल्या कर्मचाऱ्यांना करुन देणार आहेत. हॉटेलमध्ये राहण्यासाठी खोली हवी असेल तर ओळखपत्राची नोंद केली जाते. मात्र हा नियम योग्यरितीने पाळला जातोच असे नाही. किंवा बऱ्याचवेळेस असे ओळखपत्र देण्यासाठी टाळाटाळ केली जाते. ग्राहकांबरोबर येणाऱ्या मुलींची अस्वस्थता, संशयास्पद वागणे तसेच तूटक संभाषण हॉटेल किंवा लॉजच्या कर्मचाऱ्यांना समजत असते. तरीही कर्मचारी अशा बाबींकडे दुर्लक्ष करतात. आता हे टाळण्यासाठी कर्मचाऱ्यांनी अधिक जागरुक होण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. मानवी तस्करी हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा व्यवसाय मानला जातो. यामध्ये बहुतांश वेळेस महिला आणि मुलांची संख्या जास्त असते. या महिलांना मोठ्या शहरांमध्ये शरीरविक्रय करण्यासाठी भाग पाडले जाते. इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायजेशनच्या आकडेवारीनुसार मानवी तस्करीत दरवर्षी 150 अब्ज डॉलर्सची उलाढाल होत असते तसेच 2 कोटी लोक तस्करीला बळी पडतात.