मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सूचनेवरून एप्रिल २०२० मध्ये तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना, पुन्हा सेवेत घेण्यासाठी विनंती अर्ज पाठविल्याचे निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याने ईडीला दिलेल्या जबाबात म्हटले आहे.
पोलिसांनी वांद्रे येथे प्रतिबंधित एन-९५ मास्कचा साठा जप्त केला. त्यात माझी मोठी भूमिका होती. मी निलंबित असतानाही मी काम केले आहे, असा दावा वाझे याने केला. तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यावेळी देशव्यापी पत्रकार परिषदेला संबोधित केले होते. मी निलंबित असतानाही माझ्या कामगिरीवर ते आनंदी होते. त्यामुळे अनिल देशमुख यांनी माझे निलंबन रद्द करण्यात येईल, असे म्हणत मला तसा विनंती अर्ज तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना देण्यास सांगितले. त्यांनी दिलेल्या सूचनेचे मी पालन केले आणि ते रेकॉर्डवर आहे, असे वाझे यांनी ईडीला ११ डिसेंबर रोजी दिलेल्या जबाबात म्हटले आहे.
ईडीने गेल्या महिन्यात देशमुख व अन्य काही जणांवर दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रास वाझे यांचा जबाब जोडण्यात आला आहे. परमबीर सिंह यांना मी ७ एप्रिल २०२० रोजी विनंती पत्र पाठविले, असे वाझे यांनी जबाबात म्हटले आहे.
काही वर्षांपूर्वी घाटकोपर येथे झालेल्या बॉम्बस्फोटातील आरोपी ख्वाजा युनूस याच्या कोठडी मृत्यूप्रकरणी सचिन वाझे हे आरोपी आहेत. याप्रकरणी २००४ मध्ये त्यांना निलंबित केले. १६ वर्षांनंतर ५ जून २०२० रोजी त्यांना सेवेत रुजू करून घेण्यात आले. त्यांना सेवेत पुन्हा रुजू करून घेण्याचा निर्णय परमबीर सिंह अध्यक्ष असलेल्या आढावा समितीने घेतला होता.
सेवेत रुजू झाल्यावर मला समजले की, काही ज्येष्ठ राजकीय नेते मला पुन्हा सेवेत ठेवल्याबद्दल खुश नव्हते. माझे पुन्हा निलंबन करण्यासाठी परमबीर सिंह यांना फोन येत होते. दुसऱ्याच दिवशी देशमुख यांचा मला कॉल आला आणि मला सेवेत कायम ठेवण्यासाठी त्यांनी दोन कोटी रुपयांची लाच मागितली, असाही दावा वाझेने केला.
सिंह यांचाही जबाब जाेडला - याच आरोपपत्रात परमबीर सिंह यांचाही जबाब जोडण्यात आला आहे. वाझे याला सेवेत रुजू करून घेण्यासाठी देशमुख यांनी दबाव आणला होता. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व त्यांचा मुलगा आदित्य ठाकरे यांच्याकडून तशा थेट सूचना होत्या, असे सिंह यांनी ईडीला दिलेल्या जबाबात म्हटले आहे. सिंह यांना मुंबई पोलीस आयुक्तपदावरून हटवण्यात आल्यावर त्यांनी देशमुखांच्या भ्रष्टाचाराबाबत पत्र लिहिले होते.