ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 16 - राज्याचे माजी महाधिवक्ता ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. व्ही. आर. मनोहर यांनी विदर्भवादी नेते राजकुमार तिरपुडे यांना स्वत:चे कोरे लेटरहेड देऊन स्वतंत्र विदर्भ राज्य आंदोलनाला समर्थन जाहीर केले आहे. विशेष म्हणजे, या लेटरहेडचा स्वतंत्र विदर्भासाठी हवा तसा वापर करण्याची अनुमतीही तिरपुडे यांना अॅड. मनोहर यांच्याकडून मिळाली आहे. विदर्भ राज्य आंदोलनाच्या आतापर्यंतच्या इतिहासातील ही एक नाविन्यपूर्ण घटना आहे.
अॅड. मनोहर हे देशातील सन्माननीय व्यक्तीमत्व असून त्यांच्या मताला शासन दरबारी वजन आहे. त्यांच्या पाठिंब्यामुळे विदर्भ राज्य आंदोलनाला बळ प्राप्त झाले आहे. तिरपुडे इन्स्टिट्यूट आॅफ सोशल अॅक्शन अॅन्ड रिसर्चतर्फे सोमवारी माजी उपमुख्यमंत्री नाशिकराव तिरपुडे यांच्या जयंतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमांतर्गत अॅड. मनोहर यांचा सत्कार करण्यात येणार होता. त्यानंतर ह्यवेगळ्या विदर्भ राज्याची सक्षमताह्ण विषयावर त्यांचे व्याख्यान ठेवण्यात आले होते. परंतु, प्रकृती अस्वस्थतेमुळे ते या कार्यक्रमात उपस्थित राहू शकले नाही. तत्पूर्वी राजकुमार तिरपुडे अॅड. मनोहर यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या घरी गेले होते. दरम्यान, अॅड. मनोहर यांनी स्वतंत्र विदर्भासंदर्भात विचार व्यक्त करून तिरपुडे यांना स्वत:चे कोरे लेटरहेड दिले. स्वतंत्र विदर्भाच्या समर्थनार्थ लेटरहेडवर हवा तो मजकूर लिहा व माझी स्वाक्षरी घेऊन जा असे त्यांनी तिरपुडे यांना सांगितले. त्यावेळी विदर्भ माझा पक्षाचे अध्यक्ष डॉ. गोविंद वर्मा आदी उपस्थित होते. ही माहिती कार्यक्रमात जाहीर करण्यात आली. तसेच, अॅड. मनोहर यांचे कोरे लेटरहेडही सर्वांना दाखविण्यात आले.
अॅड. मनोहर यांनी विदर्भवादी नेत्यांशी चर्चा करताना विदर्भ सर्व बाबतीत स्वयंपूर्ण असल्याचे सांगितले. त्यांनी विदर्भवादींना लढा सुरू ठेवण्याचे आवाहन करून आंदोलनाला पाठिंबा दिला. आपण स्वतंत्र विदर्भासाठी कटिबद्ध आहोत असेही ते म्हणाल्याची माहिती डॉ. वर्मा यांनी कार्यक्रमात दिली. आमदार कपिल पाटील, संस्थेचे सरचिटणीस वामनराव कोंबाडे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.