- स्वप्निल कुलकर्णी मुंबई : लॉकडाऊनमुळे गेल्या सात महिन्यांपासून बंद असणाऱ्या राज्यातील ग्रंथालयांची सुटका होण्याचा मार्ग मोकळा झाला. ग्रंथालय संचालनालयाने सादर केलेल्या प्रस्तावावर शासन सकारात्मक असून, येत्या ‘वाचन प्रेरणा दिना’पूर्वीच राज्यातील शासकीय ग्रंथालये सुरू होण्याची शक्यता आहे. यामुळे राज्यातील एकवीस हजारांहून अधिक ग्रंथालयीन कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.१ आॅक्टोबरनंतर सुरू झालेल्या अनलॉकच्या पाचव्या टप्प्यातही सार्वजनिक ग्रंथालये सुरू करण्याबाबत विचार झाला नव्हता. ‘लोकमत’ने याबद्दल २८ सप्टेंबर रोजी ‘मानसिक कोंडी संपण्यासाठी ग्रंथालयांची कवाडे खुली करा’ हे वृत्त प्रकाशित केले होते. त्याची दखल घेत आणि ग्रंथालय संचालनालयातर्फे ग्रंथालय सुरू करण्यासंदर्भात प्रस्ताव सादर करण्यात आला.या प्रस्तावावर शासन सकारात्मक असून, योग्य ती सुरक्षिततेची आणि मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करून वाचन प्रेरणादिनी किंवा १५ आॅक्टोबरच्या आसपास ग्रंथालये सुरू करण्याचा निर्णय होऊ शकतो, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. तसेच ग्रंथालय, अभ्यासिका या गोष्टी थोड्या फार काळात सुरू होतील. त्याचा तपशील काही दिवसात स्पष्ट होईल, असे राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले. राज्यात सध्या १२ हजार १४९ शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालये आहेत. ती बंद असल्याने कर्मचाºयांवर उपासमारीची वेळ आली आहे.ग्रंथालय संचालनालयाने सुचविलेली कार्यप्रणाली१) प्रतिबंधात्मक क्षेत्रातील ग्रंथालये बंदच राहतील.२) ग्रंथालयांमध्ये सॅनिटायझर, थर्मल स्कॅनर, आॅक्सिमीटरची व्यवस्था करावी.३) ग्रंथालयांमध्ये मास्क वापरणे अनिवार्य करावे.४) वाचकांकडून आलेले ग्रंथ किमान दोन दिवस ‘विलगीकरण कप्प्यात’ ठेवावेत.५) वाचक कक्ष, अभ्यासिकेमध्ये ५०% अभ्यासक, वाचकांना बसण्यास परवानगी द्यावी.६) वाचक आणि कर्मचाºयांमध्ये १ मीटरचे अंतर असावे.ग्रंथालयीन सेवा सुरू करण्यासाठी आम्ही आधीपासूनच तयारी करत होतो. त्याबद्दल आवश्यक कार्यप्रणालीचा प्रस्ताव आम्ही शासनाला सादर केला आहे. शासन त्याबद्दल सकारात्मक आहे. १५ आॅक्टोबरपूर्वीच ग्रंथालयीन सेवा सुरू होतील, असा विश्वास आहे.- शालिनी इंगोले, प्रभारी ग्रंथालय संचालक, ग्रंथालय संचालनालय, मुंबई
‘वाचन प्रेरणा दिना’आधी ग्रंथालये सुरू होण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2020 2:36 AM