पुणे : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संग्रहालय उभारणीनंतर आता सिंबायोसिस संस्थेने ‘डॉ.आंबेडकर लायब्ररी’ निर्माण करण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. ग्रंथसंपदेने वैचारिक समृद्धता लाभते, असे मानणाऱ्या डॉ. आंबेडकरांना ग्रंथालयाच्या रूपाने अभिवादन केले जाणार आहे. एक ते दीड महिन्यात ही लायब्ररी सर्वांसाठी खुली होणार आहे. सिंबायोसिस संस्थेने डॉ. आंबेडकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त १४ एप्रिल १९९० रोजी डॉ. आंबेडकर स्मारक आणि संग्रहालयाची पायाभरणी केली. वास्तुशिल्पकार धनंजय दातार यांनी बुद्धवास्तुकलेच्या शैलीतील आणि स्तूपाच्या आकारातील ही वास्तू उभी केली. सिंबायोसिसच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक आणि संग्रहालयाच्या मानद संचालिका डॉ. संजीवनी मुजुमदार म्हणाल्या, ‘‘डॉ. आंबेडकर यांचे पुस्तकप्रेम सर्वांना सुपरिचित आहे. याच जाणिवेतून सिंबायोसिसने या वास्तूच्या आवारात डॉ. आंबेडकर खुली उद्यान लायब्ररी तयार केली आहे. सकाळी ७ ते रात्री ११ या वेळेत सुमारे ५०० विद्यार्थी या उद्यानात कुठेही बसून अभ्यास करतात. एकमेकांशी चर्चा करतात. सुमारे ५ हजार पुस्तके येथे उपलब्ध आहेत. ही जागा अपुरी पडत असल्याने डॉ. आंबेडकर लायब्ररीची वास्तू उभी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार या वास्तूमध्ये पुस्तकांच्या दालनासह आदी गोष्टींचा समावेश असणार आहे.
सिंबायोसिसमध्ये साकारतेय लायब्ररी
By admin | Published: April 14, 2015 1:10 AM