डब्ब्यात गोलमाल : अनेक बाबी गुलदस्त्यात
नागपूर : अब्जोवधींची सट्टेबाजी करणाºया डब्बा ट्रेडिंगचा सूत्रधार रवी अग्रवाल याच्याकडे सापडलेल्या पिस्तुलाचा परवानाही नागालॅण्डचाच असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. त्याच्या भावाकडे यापूर्वी आढळलेला पिस्तुल परवाना नागालॅण्डचाच होता. विशेष म्हणजे, तब्बल ५० काडतुसांसह पिस्तुल बाळगणाºया रवी अग्रवालने त्याच्याकडे पिस्तुल, काडतूस किंवा परवाना आहे, त्याची पोलिसांना कल्पनाही दिली नव्हती. दोन दिवसांपूर्वी एका वित्तीय संस्थेच्या लॉकरची तपासणी केली तेव्हा पिस्तुल आणि काडतूस आढळले. त्यानंतर या प्रकरणाला पुन्हा एक नवे वळण मिळाले.
या संबंधाने गुन्हेशाखेचे अतिरिक्त आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्याशी पत्रकारांनी चर्चा केली असता डब्बा प्रकरणातील अनेक बाबी गुलदस्त्यात असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, असे सांगून त्यांनी काही बाबींवर खुलासे करता येणार नाही,असे म्हटले. मात्र, पिस्तुल आणि काडतुसात नवीन गुन्हा दाखल करणार काय, त्याबाबतची माहिती पोलीस उपायुक्त अभिनाश कुमार सांगू शकतात, असे ते म्हणाले. अभिनाश कुमार यांनी या संदर्भात चुप्पी साधली आहे, हे विशेष !
दुसरे म्हणजे, गुन्हेशाखेच्या पोलिसांनी उच्च न्यायालयात मंगळवारी शपथपत्र दाखल केले. त्यात डब्बा सट्टेबाजीच्या आड समांतर शेअर मार्केट सुरू करून देशविदेशातील हजारो व्यापाºयांना अब्जोवधींचा फटका देणाºया रवी अग्रवाल याचा खास साथीदार कन्नी थावरानी याची एकट्याची २०१२ ते २०१६ या कालावधीतील उलाढाल १ लाख हजार १८ कोटी रुपयांची असल्याचे त्यांनी सांगितले. लोकमतने बुधवारच्या अंकात तसे ठळकपणे प्रकाशित केले होते, हे येथे उल्लेखनीय !
कन्नीकडून रवीनेच ही उलाढाल करून घेतल्याचा पोलिसांना संशय आहे. दुसरे म्हणजे, अन्य एका अग्रवालची उलाढाल ५ हजार कोटींची आहे. अन्य आरोपींच्या व्यवहाराची माहिती पोलिसांकडून उघड झालेली नाही. दुसरे म्हणजे, व्हायरल झालेला गोळीबाराचा व्हिडीओ, त्याची चौकशी आणि कारवाईसंदर्भातील अनेक प्रश्नांची पोलिसांकडून उत्तरे मिळत नसल्याने डब्ब्याचा गोलमाल नव्याने चर्चेला आला आहे.