अनिरूध्द पाटील लोकमत न्यूज नेटवर्कबोर्डी : भारतात लिचीचे उत्पादन ज्या मोजक्या भागात होते, त्यात घोलवडचा समावेश आहे. येथील हवामान व पाणी या फळासाठी नंदनवन असून, उन्हाळ््यात पर्यटक खास तिचा आस्वाद घेण्यासाठी येथे दाखल होतात. मात्र, बदलत्या हवामानामुळे यंदा उत्पादन घटल्याने लिचीचे भाव गगनाला भिडले आहेत. १५० फळांच्या करंडीसाठी ८०० रुपये सध्या मोजावे लागत आहेत. मागील वर्षी हा दर ५०० रुपये होता, तर एका फळाची किंमत ६ ते १० रुपये आहे.लिचीचे शास्त्रीय नाव लिची चायनेन्सीस असून, तिचे मूळ चीनमध्ये आहे. सतराव्या शतकात तिचे भारतात आगमन झाले. पालघर जिल्ह्याच्या डहाणू तालुक्यातील घोलवड आणि बोर्डी येथील हवामान तिला सर्वाधिक मानवते. त्यामुळेच हवामान आणि जमिनीच्या प्रकारानुसार तिच्या ८ ते १० जाती आहेत. घोलवड लिची म्हणून प्रसिद्ध असलेल्या जातीमध्ये अर्ली व लेट असे दोन प्रकार आहेत. बियांपासून वाढलेल्या झाडाला १५ वर्षांनी तर गुटी कलमापासून वाढलेले झाड ७ ते ८ वर्षांनी फळे देते. एका झाडाचे सरासरी उत्पादन ११५ किलोपर्यंत येते. धारणा झाल्यानंतर ५० ते ५५ दिवसांत फळ काढणीस तयार होते. नारंगी रंग जाऊन गुलाबी, लालसर रंग आला की, फळे तयार होतात. मेचा मध्य ते जूनचा पहिला आठवडा काढणीचा हंगाम आहे. बांबूच्या करंड्यात किंवा खोक्यात करंज झाडाचा हिरव्या पाल्यात तिचे पॅकिंग केली जाते. सध्या या फळावर लाल कोळी, साल खाणारी अळी, लालभुंगा, नागअळी आदींचा प्रादुर्भाव वाढला आहे. शिवाय बदलत्या हवामानामुळे उत्पादनात घट होत असल्याने, बागायतदारांनी झाडे छाटण्यास सुरुवात केली आहे. खते व कीटकनाशकांच्या वाढत्या किमती, मजुरीचे वाढीव दर, यामुळे उत्पादन खर्च वाढला असून, गत वर्षी १५० फळांसाठी ५०० रुपयांचा दर या हंगामात ८०० रुपयांच्या घरात पोहोचला आहे. त्यामुळे स्थानिक, तसेच परगावतून या फळांचा आस्वाद घेण्यासाठी येणाऱ्या खवयांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. केवळ धनाढ्य लोकांच्या आवाक्यातील श्रीमंत फळ म्हणून ते आता अस्तित्वात उरले आहे.
लिचीचा भाव गगनाला
By admin | Published: May 23, 2017 3:30 AM