नागपूर : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची आर्थिक स्थिती बिकट आहे. त्यामुळे या विभागातील ६३५१ अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेतन देण्याबाबतचा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीपुढे लवकरच ठेवला जाईल, अशी ग्वाही पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी गुरुवारी विधान परिषदेत नियम ९३ अन्वयेवरील सूचनेच्या उत्तरात दिली. जीवन प्राधिकरण विभागातील कर्मचाऱ्यांच्या वेतन व भत्त्यासाठी शासनाकडून अनुदान दिले जात नाही. त्यामुळे या विभागातील कर्मचाऱ्यांच्या वेतन व भत्यांची जबाबदारी स्वीकारल्यास शासनावर ३५० कोटींचा वाषिक आर्थिक बोजा पडणार आहे. या प्रस्तावाला मंत्रिमंडळाची मान्यता आवश्यक आहे. हा प्रस्ताव मंत्रिमंडळापुढे ठेवण्यासाठी नियोजन व वित्त विभागाच्या मान्यतेस्तव प्रस्ताव सादर केला होता. परंतु या प्रस्तावाच्या अनुषंगाने वित्त विभागाने काही मुद्दे उपस्थित केले आहे. त्याबाबत स्पष्टीकरण दिल्यानंतर हा प्रस्ताव मंजुरीसाठी मंत्रिमंडळापुढे ठेवला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जीवन प्राधिकरणच्या कर्मचाऱ्यांना वेतन देणार
By admin | Published: December 18, 2015 2:40 AM