- संतोष हिरेमठ औरंगाबाद : रुग्णांना मृत्यूच्या दाढेतून व आजारांतून बाहेर काढणाऱ्या डॉक्टरांचे लाइफ कमी होत आहे. रुग्णसेवेसाठी रात्री-अपरात्री धाव घेण्यासह अनेक कारणांनी डॉक्टरांना ताणतणावाला तोंड द्यावे लागत आहे. त्यातूनच अनेक आजारांना डॉक्टरही बळी पडत आहेत. त्यामुळे आयुष्यमान कमी झाल्याची चिंता डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.डॉक्टर होण्यापर्यंत व नंतरच्या प्रवासात डॉक्टरांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. रुग्णांचा विश्वास संपादन करण्यासाठी मोठा काळ जातो. चोवीस तास उपलब्ध राहावे लागते. रात्री कितीही वाजता धाव घ्यावी लागते.इंडियन मेडिकल असोसिएशनने केलेल्या सर्वेक्षणातून सामान्य व्यक्तीपेक्षा डॉक्टरांचे लवकर मृत्यू होत असल्याचे आढळून आले. सर्वसामान्यांचे आयुष्यमान ६५ ते ७० वर्षे आहे. मात्र, डॉक्टरांचे आयुर्मान ५५ ते ६० वर्षांदरम्यान असल्याचे समोर आले आहे. काम अधिक व वेळेअभावी पुरेसा आहार, व्यायामाकडेही दुर्लक्ष, नोकरीच्या ठिकाणी व रुग्णालयात होणारी कामाची कसरत, स्पर्धेत टिकून राहण्याचे आव्हान, रुग्णांची वाढती संख्या, नातेवाईकांकडून मारहाणीची भीती, अशा कारणांनी ताणतणाव वाढत जातो.पुरेशी काळजी घेतल्यानंतरही आजारांचा संसर्ग होणे, आरोग्याकडे दुर्लक्ष आणि त्यातूनच अनेक आजारांना बळी पडण्याची वेळ डॉक्टरांवर येत आहे. यातून हृदयविकार, ब्रेन स्ट्रोक, हायपरटेंशन, मधुमेह यांचे प्रमाण डॉक्टरांमध्येही वाढत आहे. हृदय व रक्तवाहिन्यांच्या विकारांनी डॉक्टरांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक असल्याचे हे सर्वेक्षण सांगते.स्वत:चीही काळजी घ्यावीसर्वेक्षणातून डॉक्टरांचे आयुष्य ५५ ते ६० वर्षे, तर सर्वसामान्य व्यक्तीचे आयुष्य ६५ ते ७० वर्षे इतके असल्याचे दिसून आले आहे. डॉक्टरांची जीवनशैली तणावपूर्ण आहे. त्यातून अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे. या सगळ्यावर मात करण्यासाठी रुग्णांबरोबर डॉक्टरांनी स्वत:चीही काळजी घेणे गरजेचे आहे.- डॉ. शोएब हाश्मी, व्यवस्थापकीय संचालक, एशियन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल
डॉक्टरांचेच ‘लाइफ’ होत आहे कमी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2019 3:33 AM