अकोला- सिटी हॉस्पिटलमध्ये गोरेगाव येथील इसमावर करण्यात आलेल्या शस्त्रक्रियेतील हेराफेरीच्या चौकशीसाठी शनिवारी तीन समित्या गठित करण्यात आल्या आहेत. यामधील एक समिती शस्त्रक्रियेची चौकशी करणार असून, दुसरी समिती फौजदारी कारवाईसाठी चौकशी करून अहवाल सादर करणार आहे तर तिसरी समिती सिटी हॉस्पिटलमध्ये जीवनदायी योजनेतून करण्यात आलेल्या शस्त्रक्रियांचे सर्व दस्तऐवज ताब्यात घेउन त्या रुग्णांची तपासणी व चौकशी करणार आहे. तीनही समित्यांच्या चौकशीमध्ये जीवनदायीचा मलिदा लाटणार्यांचे व गरिबांच्या जीवाशी खेळणार्यांचे संपूर्ण उत्खनन होणार आहे. गोरेगाव खु. येथील रहिवासी पांडुरंग दगडू वाघ (५२) यांना पाठीचा त्रास असल्याने त्यांच्यावर रामदासपेठेतील सिटी हॉस्पिटलमध्ये डॉ. उमेश गडपाल व डॉ. अतुल महाशब्दे यांनी पाठीच्या मणक्यांची शस्त्रक्रिया केली. या शस्त्रक्रियेत वाघ यांच्या पाठीमध्ये दोन स्क्रू टाकण्यात आले; मात्र काही वेळेतच स्क्रू पुन्हा काढण्यात आले. यामध्ये सिटी हॉस्पिटल प्रशासनासह डॉक्टरांनी स्क्रूची रक्कम जीवनदायी योजनेतून लाटण्याचा प्रयत्न केला असून, त्यानंतर स्क्रूदेखील परत दुसर्या शस्त्रक्रियेसाठी वापरण्याचा त्यांचा बेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. डॉक्टरांनी केलेल्या एका शस्त्रक्रियेमधून डॉक्टरांसह हॉस्पिटल प्रशासन सुमारे दोन लाख रुपयांची रक्कम लाटणार असल्याचीही माहिती आहे. त्यामुळे या हॉस्पिटलमध्ये अशाच प्रकारच्या शस्त्रक्रिया झाल्याचा संशय राज्याच्या आरोग्य विभागाच्या प्रधान सचिव डॉ. मीना लोचणी यांना आल्याने त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश जीवनदायी आरोग्य योजनेचे मुख्य सचिव, आरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व संचालकांना दिले आहेत.
जीवनदायीचा मलिदा लाटणार्यांचे होणार उत्खनन
By admin | Published: July 06, 2014 12:34 AM