पुणे : मोठं नाव कमावलेल्या लोकांमध्ये नेहमीच रसिकता असते. रसिकतेशिवाय जीवनाला अर्थ प्राप्त होत नाही, असे मत शिवशाहीर बाबसाहेब पुरंदरे यांनी व्यक्त केले. गुरुवर्य डी. एस. खटावकर कला प्रतिष्ठानतर्फे डी. एस. खटावकर यांच्या स्मरणार्थ कलाक्षेत्रातील योगदनाबद्दल ज्येष्ठ चित्रकार डॉ. मुरली लाहोटी यांना कला जीवनगौरव पुरस्कार, तर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांना गणेशोत्सवातील संस्मरणीय कामगिरीकरिता दत्तप्रभा जीवनगौरव पुरस्काराने मंगळवारी गौरवण्यात आले, त्या वेळी पुरंदरे बोलत होते.पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक, शिक्षणतज्ज्ञ डॉ. शां. ब. मुजुमदार, माजी आमदार उल्हास पवार, प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक खटावकर आदी उपस्तिथ होते.आजची मुले ही चुकीच्या वाटेला चालली आहेत, अधिक अविवेकी होत चालली आहेत, ही खेदजनक बाब आहे, असे पुरंदरे म्हणाले. कलेविषयी ते म्हणाले, ‘‘कलेच्या क्षेत्रात आपण सगळेच लहान आहोत. मुलांमध्ये कलेची आवड निर्माण करण्याची जबाबदारी पालकांची आहे.’’ मुक्ता टिळक म्हणाल्या, ‘‘खटावकरांची मुलाखत घेण्याची संधी मिळाली. गणेशोत्सवात गणेशाच्या वेगळ्या मूर्तींचे स्वरूप त्यांनी तयार केले होते. त्यांनी शिल्पकला कशी पाहायची, याचे मार्गदर्शन केले. सध्या शिल्पकला कशी पहावी, कलेचा आस्वाद कसा घ्यावा, याचे वर्ग घेण्याची गरज आहे.’’ (प्रतिनिधी)>विषयाला संपूर्ण आयुष्य देऊन डी. एस. खटावकर यांनी लोकांना मार्गदर्शन केले. त्यांच्या वागण्यातून त्यांनी एक आदर्श निर्माण केला. विविध मंडळांच्या देखाव्यांच्या सजावटीमध्ये खटावकरांची प्रेरणा असायची. समाजाच्या मनामध्ये कलाकारांसारखे लोक असतात म्हणून समाज पुढे जात असतो. उत्सवांबाबत अनेक कायदे आहेत. ज्या दिवशी कायदा जन्माला येतो, तेव्हा पळवाटही निर्माण होते. मात्र, जे कायद्याने होत नाही, ते संस्काराने करावे लागते.- गिरीश बापट, पालकमंत्री
रसिकतेशिवाय जीवनाला अर्थ नाही
By admin | Published: April 05, 2017 1:02 AM