मलकापूर (जि. बुलडाणा): बंदुकीने गोळ्या झाडून पोलीस उपनिरीक्षकांची हत्या केल्या प्रकरणातील दोन महिला निर्दोष तर दोघा आरोपींना मलकापूर न्यायालयाने आजन्म कारावास तसेच प्रत्येक गुन्ह्यात प्रत्येकी एक हजार रुपये दंड अशी शिक्षा १३ एप्रिल रोजी सुनावली. या दोघा आरोपींची सुनावणी असल्याने मलकापूर न्यायालयाला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.अमरावती येथे आरोपींना अटक करण्यासाठी गेलेल्या पथकावर १५ जानेवारी २0११ रोजी आरोपी राजू ऊर्फ मुकेश पुनमचंद डांगरा (पटेल), दीपक ऊर्फ गोलु आनंदा तायडे यांनी सुमारास तुफान गोळीबार केला होता. यामध्ये पोलीस उपनिरीक्षक संजय चौगुले यांच्या पोटात गोळी लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलीसांना आरोपी राजू ऊर्फ मुकेश पुनमचंद डांगरा (पटेल), दीपक ऊर्फ गोलु आनंदा तायडे, मंगला ऊर्फ संगीता राजू ऊर्फ मुकेश डांगरा (पटेल), श्रीमती कमला डेंगु जामोदे यांच्याविरुद्ध कलम ३0२, ३0७, ३५३, १0९, २0१, ३४ भादंवि तसेच आर्म अँक्ट कलम ३, २५ नुसार १६ जानेवारी २0११ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील १९ साक्षीदार तपासण्यात आले. सरकार पक्षातर्फे तत्कालीन सरकारी वकील अविनाश तांदुळकर यांनी कामकाज पाहिले, तर सहायक सरकारी वकील विवेक मा.बापट यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून १३ एप्रिल रोजी मलकापूर येथील जोड न्यायालयाचे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश आशिष एम. पटेल यांनी मंगला पटेल व कमलाबाई जामोदे या दोन्ही महिलांची या गुन्ह्यातून सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली तर आरोपी दीपक ऊर्फ गोलु आनंदा तायडे व राजू ऊर्फ मुकेश पुनमचंद डांगरा (पटेल) या दोघांना कलम ३0२ मध्ये आजन्म कारावास, कलम ३५३ नुसार दोघांनाही एक वर्षाची शिक्षा, कलम ३0७ नुसार ७ वर्षे शिक्षा, या तिन्ही गुन्ह्यात प्रत्येकी १ हजार रुपये दंड तर यातील आरोपी राजू ऊर्फ मुकेश यास कलम २0१ नुसार तीन वर्षे सक्तमजुरी व ५00 रुपये दंड, आर्म अँक्ट कलम २५ नुसार एक वर्ष सक्तमजुरी व ५00 रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.
पीएसआयच्या हत्येप्रकरणी दोघांना जन्मठेपेची शिक्षा
By admin | Published: April 14, 2016 1:48 AM