नाशिक : सहकारी कैद्याच्या डोक्यात लाकडी फळी मारून खून केल्याची घटना १६ आॅक्टोबर २०१३ रोजी नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात घडली होती़ या खुन प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश एम़एच़मोरे यांनी आरोपी सोपान सुदाम पगारे यास जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे़या खटल्याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील सर्कल नंबर पाच व सर्कल नंबर सहामध्ये मयत विशाल बाळासाहेब चौधरी व विजय उर्फ विजू रमेश इप्पर व आरोपी सोपान सुदाम पगारे यांना ठेवण्यात आले होते़ मयत चौधरीने वहिचे पान फाडल्याचा राग पगारेच्या मनात होता़ या रागातून १६ आॅक्टोबर २०१३ रोजी सकाळच्या सुमारास आरोपी पगारे याने झोपेत असलेल्या चौधरीच्या डोक्यात शौचालयातील लोखंडी खिळे असलेल्या लाकडी फळी मारून खून केला़ तर प्रतिकार करणाऱ्या विजय इप्परलाही मारहाण केली़ जिल्हा व सत्र न्यायाधीश एम़एच़मोरे यांच्या या न्यायालयात हा खून खटला सुरू होता़ यामध्ये जिल्हा सरकारी वकील राजेंद्र घुमरे यांनी घटनास्थळी उपस्थित असलेले कारागृह कर्मचारी, डॉक्टर, जखमी इप्पर असे दहा साक्षीदार तपासले़ या खटल्यात समोर आलेल्या साक्षी व पुराव्यानुसार न्यायाधीश मोरे यांनी बुधवारी (दि़२९) आरोपी सोपान पगारे यास जन्मठेपेची शिक्षा सुनावली़ (प्रतिनिधी)-
नाशिकरोड कारागृहातील चौधरी खून प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा
By admin | Published: June 29, 2016 7:20 PM