ऑनलाइन लोकमत
सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रात डॉ. अभय बंग हे नाव आज एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे घेतलं जातं. या दीपस्तंभालाही दिशा दाखवण्याचं काम कुणी केलं असेल तर ते डॉ. राणी बंग यांनी. आपलं सारं आयुष्य या डॉक्टर दाम्पत्यानं सार्वजनिक आरोग्यासाठी वाहून घेतलं. आपल्या ‘सर्च’ या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी गडचिरोलीसारख्या अतिमागास आणि आदिवासी भागातून कार्य सुरू केलं. पण त्याचा विस्तार आज देशपातळीच्या सीमा ओलांडून आंतरराष्ट्रीय पातळीवर गेलं आहे. बालमृत्यू रोखण्याचं त्यांचं मॉडेल आज ‘युनिसेफ’नंही उचलून धरलंय. त्यामुळेच जन्माला येण्यापूर्वीच किंवा जन्म घेताच जगाचा निरोप घेणारी अनेक बालके आज मुक्तीचाच नव्हे तर स्वातंत्र्याचाही श्वास घेत आहेत.
राणी बंग यांची वैद्यकीय शिक्षणातील कारकीर्द हेवा वाटण्याजोगी लखलखीत होती. प्रसूतिशास्त्र म्हणजे गायनॅकॉलॉजीत एम.डी. ला गोल्ड मोडल मिळविणाऱ्या राणी यांना घसघशीत पैसा मिळवून देणाऱ्या मार्गाचा मोह झाला नाही. त्याऐवजी त्यांनी बाळंतपण आणि त्याच्याही पल्याड असलेल्या महिलांच्या आरोग्यविषयक प्रश्नांवर काम करून समाजऋण फेडण्यात धन्यता मानली. स्त्री रोगाचे एक भयानक अवजड ओझे ग्रामीण महिला कसे हकनाक अंगावर वागवत आहेत, हे सर्वात आधी जगाला सप्रमाण दाखवून दिले, ते राणी बंग यांनी.