सचिन भोसले -कोल्हापूर -लक्षतीर्थ येथील एकवीस वर्षीय अहमद अत्तार याचे चार वर्षांपूर्वी अचानक अंग सुजले. डॉक्टरांना दाखविताच अहमदला किडनी विकार असल्याचे निष्पन्न झाले. औषधोपचार घेऊन काहीच फायदा झाला नाही. आता डॉक्टरांनी किडनी प्रत्यारोपण करण्याचा सल्ला दिला. किडनी देण्यासाठी वडील जमीर आणि अहमदची आत्या गुलशन यांनी तयारी दाखविली. मात्र, किडनी प्रत्यारोपण करण्यासाठी मोठा खर्च असल्याने अत्तार कुटुंबीय हवालदिल झाले आहे. यासाठी त्यांना हवाय समाजाच्या मदतीचा हात...अंबाई टँक येथील रंकाळा उद्यानासमोर दररोज खेळण्यातील रिमोटवर चालणाऱ्या गाड्यांवर लहान मुलांना फेरी मारण्याचा व्यवसाय करणाऱ्या जमीर अत्तार यांना अहमद, रियाज, रज्जाक अशी तीन मुले. पत्नी सुरय्यासह त्यांचा संसार उत्तम चालला होता. चार वर्षांपूर्वी मोठा मुलगा अहमद हा कॉलेजला का जात नाही, म्हणून विचारणा केली तर त्यांना त्याचे अंग सुजल्याचे दिसून आले. त्यांनी घराशेजारील डॉक्टरना अहमद याला दाखविले. त्यांनी प्रथमोपचार केला; पण अहमदला काही बरे वाटले नाही. पुढे कोल्हापुरातील डॉक्टरांना दाखविले असता त्याला किडनी विकार असल्याचे पुढे आले. आठवड्यात दोन वेळा डायलेसिस करावे लागते. डायलेसिसनंतर अहमद काही दिवस तरतरीत राहतो. मात्र, पुन्हा डायलेसिस असे चक्र सुरू आहे. आता तर डॉक्टरांनी किडनी प्रत्यारोपणाशिवाय पर्याय नसल्याचे सांगितल्याने अत्तार कुटुंबीय हवालदिल झाले. पण धीर न खचता अहमदचे वडील जमीर आणि जरगनगर येथे राहणारी आत्या गुलशन अत्तार यांनी किडनी देण्याची तयारी दर्शवली. मात्र, प्रत्यारोपणाचा खर्च आवाक्याबाहेर असल्याने कुटुंबीय सुन्न झाले आहे. आतापर्यंत जेवढी पुंजी होती, तेवढी डायलेसिससह अन्य उपचारांवर खर्च केली. आता मोठा खर्च असल्याने जमीर यांनी समाजातील दानशूरांनी मुलाच्या उपचारांसाठी मदतीचा हात देण्याचे आवाहन केले. ज्यांना अहमद याच्या शस्त्रक्रियेसाठी मदत द्यायची आहे, त्यांनी बँक आॅफ इंडिया, महाद्वार रोड शाखा, खाते क्रमांक ०९०२१८२१०००४९४४ यावर आपली मदत जमा करावी.
जगणं आता ‘त्यांच्या’ हाती
By admin | Published: August 03, 2015 11:42 PM