मुंबई : मालाड (पूर्व) येथील महिंद्रा नगरमधील एकूण ३६ इमारतींची सोसायटी असलेल्या कैलाशचंद्र को-आॅप. सोसायटी या सोसायटीतील बी ३ ही इमारत धोकादायक अवस्थेत असल्याने मुंबई महापालिकेने सोसायटीला महापालिका कलम ३५२ (बी) अन्वये नोटीस बजावली आहे. दरम्यान, इमारत धोकादायक असताना सोसायटी इमारतीची डागडुजी करीत नसल्याबद्दल रहिवासी संताप व्यक्त करीत आहेत. गेल्या काही वर्षांत मुंबई व ठाणे येथे अनेक धोकादायक इमारती कोसळल्या. त्यात अनेकांना प्राण गमवावे लागले तसेच कोट्यवधी रुपयांची वित्तहानीसुद्धा झाली. वर्षानुवर्षे इमारतीची डागडुजी केली जात नसल्याने काही वर्षांत अशा इमारती जर्जर अवस्थेत येऊन एखाद्या पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळतात. त्यात शेकडो कुटुंबे उद्ध्वस्त होतात. अशा अनेक घटना घडत असतानाही अजूनही अनेक इमारतींतील रहिवासी व सोसायट्यांचे पदाधिकारी याकडे दुर्लक्ष करताना दिसतात.या इमारतीच्या आतील बाजूला ठिकठिकाणी मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. या भेगा आणि कोसळलेल्या छतामध्ये पावसाचे पाणी जाऊन ते इमारतीच्या भिंतींमध्ये जिरत असल्याने या भिंती कमकुवत होत साहजिकच इमारत धोकादायक झाली आहे. याबाबत दखल घेत बी ३ या इमारतीचे रहिवासी आणि राष्ट्रीय भ्रष्टाचार आणि अपराध निवारक परिषदेचे अध्यक्ष मोहन कृष्णन यांनी महापालिकेकडे लेखी तक्रार केली. त्या तक्रारीची दखल घेत महापालिकेच्या पी /उत्तर विभाग कार्यालयामार्फत या इमारतीला मुंबई महापालिका अधिनियम १८८८ कलम ३५३(बी) अंतर्गत नोटीस बजावण्यात आली आहे. या नोटिसीनुसार कैलाशचंद्र सहकारी गृहनिर्माण संस्थेला ३0 दिवसांच्या आत स्ट्रक्चरल आॅडिट करून घ्यायचे आहे.तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार बी ३ इमारतीची दुरुस्ती २00५ साली करण्यात आली आहे. त्यानंतर गेली अकरा वर्षे सदर इमारतीची कोणतीही डागडुजी करण्यात आलेली नाही. तसेच २0१५ साली या इमारतीचे स्ट्रक्चरल आॅडिट झाले. त्या आॅडिट रिपोर्टमध्ये या इमारतीची त्वरित दुरुस्ती करण्याची आवश्यकता असून दर दहा वर्षांनी इमारतीची डागडुजी व स्ट्रक्चरल आॅडिट करणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते.आता कमिटीने या इमारतीच्या सर्व गाळेधारकांना लेखी पत्राद्वारे इमारतीची तत्काळ दुरुस्ती करण्याबाबत पत्रे पाठविली. त्यानुसार बरेचसे सदस्य प्रत्येकी ७२ हजार रुपये इतकी रक्कम काढण्यास तयार झाले. परंतु काही फ्लॅटधारक त्यासाठी तयार नाहीत. त्यातील दोघा-तिघांचे म्हणणे आहे की, २0१५ साली आम्ही सर्वांनी इमारत दुरुस्तीसाठी प्रत्येकी ५२ हजार रुपये चेकद्वारे सोसायटीकडे जमा केले होते. पण एखाददुसऱ्या सभासदाने चेक देण्यास नकार दिला म्हणून सोसायटीने काही दिवसांनी आमचेही चेक परत केले होते. सोसायटीच्या या बेजबाबदारपणामुळे सोसायटी दुरुस्तीबाबत गंभीर आहे, याबद्दल खात्री नाही. त्याचवेळी सोसायटीने कडक भूमिका घेतली असती तर उर्वरित सभासदांनीही इमारत दुरुस्तीसाठी पैसे दिले असते. तसेच सोसायटीकडे इमारत दुरुस्ती निधी म्हणून आठ लाख रुपये जमा आहेत. त्या वेळी सोसायटीने ती रक्कम वापरून दुरुस्ती करून घ्यावयास हवी होती. पैसे वेळेवर दिले नाहीत त्या सभासदांना नियमानुसार दंड आकारून पैसे जमा करता आले असते. मात्र सोसायटीने तसे न केल्याने आज ही दुरवस्था झाली आहे.
रहिवाशांचा जीव टांगणीला
By admin | Published: April 29, 2016 3:19 AM