ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 02 - घाटी रुग्णालयात किडनीच्या आजाराला कंटाळून एका रुग्णाने स्वत:चे गुप्तांग कापून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना गुरूवारी रात्री घडली. विशेष म्हणजे सीसीटीव्ही कॅमे-यांसह पोलीस आणि मेस्कोचे जवान घाटीत खडा पहारा देत असताना ही घटना घडली.
लक्ष्मण गायकवाड असे मृताचे नाव आहे. याविषयी पोलिसांनी सांगितले की, गायकवाड हे दोन वर्षापासून किडनीविकाराने आजारी होते. त्यांच्या दोन्ही किडनी निकामी झालेल्या आहेत. त्यांच्यावर नियमित डायलिसीसही केले जात होते. १ जून रोजी त्यांना ताप आला होता आणि श्वास घेण्यात त्रास होत असल्याने नातेवाईकांनी त्यांना घाटीत दाखल केले. तेथील वॉर्ड क्रमांक ८/९ मध्ये त्यांना अॅडमिट करण्यात आले. रात्री त्यांच्यासोबत त्यांची पत्नी होती. डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरू केले होते. सुरू झालेल्या उपचारानंतरही त्यांचा त्रास कमी झाला नव्हता. त्रास असह्य होत असल्याचे त्यांनी पत्नीला सांगितले. दरम्यान, त्यांची पत्नी त्यांच्या उपचारासंबंधीची कागदपत्रांची नोंद करण्यासाठी अपघात विभागातील नोंदणी कक्षाकडे गेली. त्याचवेळी वॉर्डात खाटावर पडून असलेल्या गायकवाड यांनी आजाराला कंटाळून स्वत: चे गुप्तांग कापले. यामुळे झालेल्या जखमेतून रक्तस्त्राव होऊ लागला. गुप्तांग कापल्याने रक्तस्त्रावासोबतच त्यांचा रक्तदाब वाढला आणि ते बेशुद्ध पडले. अपघात विभागातून परत वॉर्डात गेलेल्या त्यांच्या पत्नीला हा प्रकार समजताच त्यांनी तेथील नर्सेस आणि डॉक्टरांना ही घटना सांगितली. त्यांनी त्यांच्यावर उपचार सुरू केले. उपचारादरम्यान शुक्रवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास गायकवाड यांचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती डॉक्टरांमार्फत घाटी पोलीस चौकीला कळविण्यात आली. याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. ही घटना नेमकी कशी घडली, याबाबतचा तपास पोलीस हेडकाँन्स्टेबल एस. जी. बागडे तपास करत आहेत.