मुंबई/डोंबिवली : मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेल्या पश्चिम आणि मध्य रेल्वेत सोमवारी संध्याकाळी तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे वाहतूक विस्कळीत होऊन चाकरमान्यांचे हाल झाले. पश्चिम रेल्वेच्या लोअर परेल ते महालक्ष्मी दरम्यान अप धीम्या आणि अप जलद मार्गावर रेल्वे रुळांत सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास तांत्रिक बिघाड झाला.चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या सगळ्याच लोकल उशिराने धावू लागल्या. बिघाड दुरुस्त करण्यास पंधरा मिनिटांचा अवधी लागला आणि त्यानंतर लोकल सेवा पूर्ववत करण्यात आली. मात्र चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या लोकल गाड्यांना लेटमार्क लागत असल्याने त्याचा परिणाम आपोआप चर्चगेटहून सुटणाऱ्या गाड्यांवर झाला संध्याकाळी सहा वाजेपर्यंत गाड्या उशिरानेच धावत होत्या. तर रविवारीची आगजी घटना ताजी असताना सोमवारी पुन्हा मध्य रेल्वेच्या अप जलद मार्गावरील लोकल सेवेचा वेग मंदावला. नेहमी डोंबिवली स्थानकात संध्याकाळी ४.३९ आणि ४.४२ ला अप जलद लोकलला ठाणे स्थानकात येण्यासाठी २७ मिनिटे लागली. कोपर-दिवा आणि पारसिक मार्गावर गाड्यांचा वेग मंदावला होता. यामागचे तांत्रिक कारण रेल्वेकडूनही स्पष्ट झाले नसल्याने प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण होते. पारसिक टनेलनंतर मात्र गाड्यांनी वेग धरत ठाणे स्थानक गाठले. त्यानंतर, या दोन्ही गाड्या सुरळीत धावल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
जीवनवाहिनी थंडावली
By admin | Published: April 21, 2015 1:37 AM