ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 7 - आबेद...चपलेच्या दुकानात बसून लिहित गेला जीवनाची गझल. रुद्रकुमार...या शब्दात रमणाऱ्या संगीतकाराने त्या गझलेला स्वरसाज चढविला आणि विनोद. या अवलियाने आपल्या निवेदनाने त्या गझलेच्या परिणामकारकतेला एक नवी उंची प्रदान केली. छंदापोटी सुरू झालेला हा गझलेचा प्रवास एका सीडीच्या निर्मितीपर्यंत पोहोचला आणि आज सोमवारी वनराईच्या सभागृहात या भणंग कष्टकऱ्यांनी काढलेल्या सीडीचे थाटात प्रकाशन झाले.सुगंधी बाग आहे ती... या सीडीच्या निर्मितीचा प्रवास खरच फार रंजक आहे. यवतमाळ जिल्ह्यातील सवणा येथील आबेद शेख याला गझलेचा लळा लागला. चपलेच्या दुकानात बसून तो गझल करू लागला. त्याच्या गझला रुद्रकुमार रामटेके या यवतमाळातील संगीतकाराने ऐकल्या अन् त्यांनी एक स्वप्न बौद्धमयचे या सीडीसाठी त्यातल्या काही गझल वापरल्या. दरम्यान, यवतमाळ शहरातीलच विनोद बुरबुरू यांच्या निवेदनातील गोडवा रुद्रकुमारच्या कानावर गेला आणि त्यांनी विनोदला या सांगीतिक प्रवासात सोबत घेतले. सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमुळे चर्चेत असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील शेतीचे भयाण वास्तव या तिघांनाही अस्वस्थ करायचे. त्यांनी शब्दातून शेतकऱ्यांना धीर द्यायचा निर्णय घेतला अन् आबेदच्या या... समजू नको ढगा हे, साधेसुधे बियाणे मी पेरले पिलांच्या चोचीमधील दाणे उघडा पडेल सारा, संसार हा अशाने मिटणार प्रश्न नाही गळफास घेतल्याने या शब्दांमधून आशेची गझल निर्माण व्हायला लागली. या गझलेला रुद्रकुमारचे हृदयस्पर्शी संगीत अन् विनोदचे बळ देणारे निवेदन लाभायला लागले. यातूनच या सीडीची निर्मिती झाली अन् आज तिचे नागपुरात थाटात प्रकाशनही झाले.
चपलेच्या डब्यावर लिहिली जीवनाची गझल
By admin | Published: November 07, 2016 9:15 PM