मुंबई : लातूर येथील शेतकऱ्याच्या १६ वर्षीय मुलावर मंगळवारी झालेल्या हृदयप्रत्यारोपण शस्त्रक्रियेमुळे त्याला जीवनदान मिळाले आहे. गेल्या काही दिवसांपासून तो रुग्णालयात दाखल होता. सुरतच्या महावीर रुग्णालयात मंगळवारी रात्री २२ वर्षीय तरुणाने हृदयदान केले. त्यानंतर सुरत ते मुंबईचा २६९ किमीचा प्रवास अवघ्या १ तास १९ मिनिटांत पूर्ण करत मध्यरात्री २ वाजता प्रत्यारोपण शस्त्रक्रिया सुरू करण्यात आली.
कार्डिओमायोपॅथी या आजाराने त्रस्त असलेल्या १६ वर्षीय मुलाच्या हृदयाची कार्यक्षमता कमी झाली होती. त्यामुळे हृदय प्रत्यारोपण करण्याशिवाय डॉक्टरांकडे पर्याय नव्हता. या रुग्णाची प्रकृती काही दिवसांपूर्वी खालावली होती. पण, त्याला तरुण व्यक्तीचे हृदय मिळणे आवश्यक होते. मंगळवारी मध्यरात्री सुरतच्या महावीर रुग्णालयात २२ वर्षीय मुलाला ब्रेनडेड घोषित करण्यात आले. त्यानंतर त्याच्या नातेवाइकाने हृदय, यकृत आणि मूत्रपिंड दान केले. सुरतहून हृदय मुंबईला आणले गेले. सुरत ते मुंबई हवाई मार्गासह मुंबई विमानतळ ते मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयापर्यंत ग्रीनकॉरिडोर करण्यात आला होता.
मंगळवारी मध्यरात्री १२.३८ला सुरत विमानतळावर हृदय आणण्यात आले. मध्यरात्री १ वाजून ३५ मिनिटांनी मुंबई विमानतळावर हृदय घेऊन डॉक्टर पोहोचले. आणि मध्यरात्री १.५७ वाजता हृदय घेऊन डॉक्टर रुग्णालयात पोहोचले. शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे.