पुणे : लायन्स क्लब इंटरनॅशनलच्या वतीने शताब्दी वर्षानिमित्त देण्यात येणारा जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना जाहीर झाला आहे. येत्या रविवारी १२ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे. या कार्यक्रमासाठी उद्योजक अरुण फिरोदिया, अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. के. एच. संचेती, माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती लायन्स क्लबचे प्रांतपाल चंद्रहास शेट्टी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी पुरस्कार सोहळ्याचे संयोजक आणि माजी प्रांतपाल दीपक शहा, माजी प्रांतपाल श्रीकांत सोनी, उपप्रांतपाल रमेश शहा, जनसंपर्क अधिकारी शाम खंडेलवाल उपस्थित होते. या सोहळ्यात लायन्स क्लबच्या माध्यमातून सलग ५० वर्षे व २५ वर्षे सेवा करणाऱ्या लायन्स सदस्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच लायन्स क्लबच्या माजी प्रांतपालांनी केलेल्या कामाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. या वेळी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना ‘लायन्स शताब्दी’ पुरस्कार दिला जाणार आहे. त्यामध्ये सामाजिक कार्यकर्ते नितीन देसाई, डॉ. सतीश देसाई, डॉ. मधुसूदन झंवर, डॉ. अभय मुथा, आमदार संजय भेगडे, ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक नंदकुमार सुतार, ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक विजय बावीस्कर, स्नेहालय संस्थेचे डॉ. गिरीश कुलकर्णी, डॉ. अभय सदरे आणि संजय चोरडिया यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)
अण्णा हजारे यांना लायन्सतर्फे जीवनगौरव
By admin | Published: February 08, 2017 3:23 AM