नसरापूर : भोर तालुक्यातील नसरापूर येथे बनेश्वर सेवा मंडळाच्या वतीने यावर्षी संपूर्ण आयुष्य वारकरी सांप्रदायाला वाहून घेऊन भागवताची पताका उंचावणाऱ्या पाच वारकऱ्यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार गेली ३ तप ज्यांनी अखंड पायीवारी करून भक्तिमार्गाचा प्रचार व प्रसार केला, अशा वारकऱ्यांना हा जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला.नसरापूर येथील बनेश्वर येथील वनउद्यानाच्या प्रांगणात घेतलेल्या सप्ताहाच्या समारोपाच्या वेळी ह.भ.प. संपतराव गणपत तनपुरे (गुरुजी) (नसरापूर), तुकाराम धोंडिबा कोंडे (केळवडे), गुलाबराव जाधव (कांजळे), गोपाळ म. निगडे (वीणेकरी)(किकवी), अर्जुनराव भिलारे (किकवी) यांना अर्जुनमहाराज लाड, नानासाहेब भिंताडे व वारकरी महामंडळाचे पुणे जिल्हाध्यक्ष हभप कृष्णाजी रांजणे यांच्या हस्ते या पाच वारकऱ्यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन व स्मृतिचिन्ह, रोख ११ हजार रुपये देऊन सन्मानित करण्यात आले. समाजात वावरताना समाजप्रबोधन, व्यसनमुक्ती, राष्ट्रभक्ती व पर्यावरण या बाबींवर या सप्ताहात विशेष लक्ष वेधले गेले.या वेळी उद्योजक विजयराव आठवले, नानासाहेब भिंताडे, किसनराव शिंदे पाटील, वारकरी महामंडळाचे पुणे जिल्हा अध्यक्ष कृष्णाजी विठ्ठल रांजणे, संपतराव कोकाटे, नवनिर्वाचीत पंचायत समिती सदस्य रोहन बाठे, मुरलीधर दळवी, दिनकर वाव्हळ, उमेश डिंबळे, नसरापूरचे सरपंच डॉक्टर गणेश हिवरेकर व डॉक्टर विलास इगावे आदी मान्यवर उपस्थित होते. वारकरी क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत वारकऱ्यांचा सन्मान करण्यात आला.आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते सप्ताहाची सुरुवात करण्यात आली. व्यसनमुक्ती संघाचे संस्थापक हभप बंडातात्या कराडकर, गाथा मंदिर संस्थेचे अध्यक्ष हभप पांडुरंग महाराज घुले, हभप अर्जुन महाराज लाड यांची विविध विषयांवर कीर्तने सादर केली. गेली ३१ वर्षे बनेश्वर सेवा मंडळामार्फत महाशिवरात्र महोत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा साजरा केला जातो. यावर्षी स्वानंद सुख निवासी जोगमहाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या शताब्दी महोत्सवाचे औचित्य साधून मोठ्या प्रमाणात ३१व्या वर्षाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला.गेले आठ दिवस चाललेल्या सप्ताहात ह.भ.प. तुकाराम महाराज शास्त्री यांनी शिवपुराण कथा सादर केली तर ह.भ.प.पांडुरंगमहाराज शितोळे, केशवमहाराज मुळीक, ज्ञानेश्वर माऊली कदम, उमेशमहाराज दशरथे, पांडुरंग महाराज घुले, बंडातात्या कराडकर, कृष्णानंदमहाराज शास्त्री व अर्जुन महाराज लाड गुरुजी यांचे काल्याचे कीर्तन झाले. मंडळाच्या नैमित्तिक उपक्रमानुसार ५ जणांना वारकरी जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला.(वार्ताहर)
पाच वारकऱ्यांना जीवनगौरव पुरस्कार
By admin | Published: March 01, 2017 1:02 AM