अकोला, दि. ७-औरंगाबाद येथील बॉम्बस्फोटात सहभाग असलेल्या प्रतिबंधित संघटना सिमीच्या तीन दहशतवाद्यांना सोमवारी अकोला येथील दहशतवादविरोधी पथकाच्या नव्यानेच स्थापन झालेल्या विशेष न्यायालयासमोर हजर करण्यात आले; मात्र तीनही आरोपींच्यावतीने कामकाज पाहण्यासाठी विधिज्ञ नसल्याने या कारवाईसाठी न्यायालयाने १९ नोव्हेंबर ही पुढील तारीख दिली आहे.औरंगाबाद येथे फेब्रुअरी २0१२ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटासह देशविरोधी कारवाई आणि दहशतवाद पसरविण्यात सहभाग असलेल्या सिमी या प्रतिबंधित संघटनेचे सक्रिय सदस्य जफर हुसेन इक्बाल हुसेन कुरैशी, अमान खत्री आणि अनवर खत्री या तीन आरोपींना मुंबई दहशतवादविरोधी पथक, नागपूर दहशतवादविरोधी पथक आणि अकोला दहशतवादविरोधी पथकाने सोमवारी दहशतवादविरोधी पथकाचे विशेष न्यायाधीश अ. सा. जाधव यांच्या न्यायालयासमोर हजर केले; मात्र तीनही आरोपींची बाजू मांडण्यासाठी विधिज्ञच उपस्थित नव्हते, त्यामुळे न्यायालयाने तीनही आरोपींना या संदर्भात विचारणा केली असता त्यांनी विधिज्ञ नसल्याचे सांगितले. यावरून विशेष न्यायालयाने आरोपींची बाजू मांडण्यासाठी १९ नोव्हेंबरपर्यंत विधिज्ञ ठेवण्याचे आदेश दिले, तसेच विधिज्ञ न मिळाल्यास आरोपींनी तशी माहिती न्यायालयासमोर द्यावी म्हणजे न्यायालय आरोपींची बाजू मांडण्यासाठी सरकारी वकिलाची नियुक्ती करेल, असेही आदेशात नमूद केले आहे. एकूण सात दहशतवाद्यांचा समावेशऔरंगाबाद बॉम्बस्फोटात सिमी या प्रतिबंधित संघटनेच्या सात दहशतवाद्यांचा समावेश होता. यामधील सोमवारी अकोला येथील विशेष न्यायालयात हजर केलेले जफर हुसैन इकबाल हुसेन कुरैशी, अमान खत्री, अन्वर खत्री या तिघांचा समावेश आहे, तर भोपाळ येथील चकमकीत ठार झालेले अखिल खिलजी आणि शेख सालीक हे दोघेही औरंगाबाद प्रकरणात आरोपी होते तर आणखी दोन आरोपी औरंगाबाद स्फोटात असून, या दोघातील एक आरोपी नाशिक कारागृहात असून, दुसरा आरोपी गुजरातमधील साबरमती येथील कारागृहात शिक्षा भोगत आहे.'एटीएस'चे विशेष न्यायालय अकोल्यातदहशतवादविरोधी पथकाने विदर्भात केलेल्या कारवाईचे न्यायालयीन खटले चालविण्यासाठी अकोला येथील जिल्हा व सत्र न्यायालयात दहशतवादविरोधी पथकाचे विशेष न्यायालय कार्यान्वित करण्यात आले आहे. या न्यायालयाला विशेष अधिकार देण्यात आले असून त्या अंतर्गतच हे खटले चालविण्यात येणार आहेत. औरंगाबाद बॉम्बस्फोट प्रकरणाचा खटलाही अकोला येथील विशेष न्यायालयाकडे हस्तांतरित करण्यात आला असल्यानेच सोमवारी या आरोपींची न्यायालयात पेशी करण्यात आली.मुंबईसह चार ठिकाणचे खटले हस्तांतरितमुंबई, नागपूर, अमरावती आणि अकोल्यात दाखल असलेले काही खटले इतर ठिकाणच्या न्यायालयात चालविण्यात येत होते; मात्र दहशतवाद विरोधी पथकाच्या विशेष न्यायालयाचे अधिकार अकोला येथील जिल्हा व सत्र न्यायालयाला प्राप्त झाल्यानंतर हे खटले अकोला येथील विशेष न्यायालयात हस्तांतरित करण्यात आले आहेत. या अंतर्गतच औरंगाबाद बॉम्बस्फोट खटल्याचा समावेश आहे.
वर्दीवर पुन्हा उचलला हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2016 2:22 AM