लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाण्यासह जिल्ह्याच्या विविध भागांना शुक्रवारी रात्री बसलेल्या वळवाच्या फटक्याने काही काल दिलासा मिळाला. वातावरणात हलका गारवा पसरला. पण पंधरा-वीस मिनिटांच्या पावसानंतर बंद झालेला वीजपुरवठा अनेक भागांत दोन तासांनंतर कसाबसा सुरळीत झाला. त्यामुळे पाऊस सरताच असह्य उकाड्याने नागरिक हैराण झाले. काही भागात झाडे कोसळली. भिवंडीत घराची भिंत कोसळून सहा जण जखमी झाले. शनिवारी सकाळीही काही भागांत पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. त्यानंतर मात्र आर्द्रता वाढल्याने दिवसभर उकाड्याने नागरिक हैराण झाले.ग्रामीण भागात तर वीजपुरवठ्याच्या व्यत्ययाने कहर केला. त्यामुळे पावसानंतर घामाच्या धारा बरसण्याचा अनुभव लोकांना घ्यावा लागला. पावसामुळे रेल्वेची वाहतूक क्षणार्धात कोलमडली, पण नंतर रस्त्यावरील वाहतुकीलाही त्याचा फटका बसला. ही वाहतूक मंदगतीने सुरू हती. पावसाने काही भागात झाडे कोसळली. मात्र कोणतीही दुर्घटना घडली नसल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली. उल्हासनगरात वीज बंद उल्हासनगर : वळवाच्या पावसाने शुक्रवारी रात्री हजेरी लावताच वीजपुरवठा बंद झाला. पाऊस संपूनही मध्यरात्री दीडपर्यंत तो सुरळीत न झाल्याने उकाड्याने हैराण झाले. लालचक्की चौक परिसरात झाड पडले. पावसामुळे अघटीत घटना होऊ नयेत, म्हणून वीजपुरवठा खंडित केल्याची माहिती वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली. >शहापुरात लग्नाचा बेरंगभातसानगर : वादळी वाऱ्यांसह अचानक आलेल्या पावसाने शहापूर तालुक्यालाही झोडपले. या वातावरणाने लग्नाचा बेरंग करून टाकला. विजांच्या कडकडाटासह आलेल्या पावसाने साऱ्यांची दाणादणा उडवली. अनेक भागात उघड्यावर ठेवलेल्या शेतमालाचे नुकसान झाले. शेतकरी पावसाळापूर्व कामे आटोपण्याची लगबग करीत असतानाच त्यांना पावसाने अवचित गाठले. लग्नसराईच्या सध्याच्या हंगामाचा पावसाने बेरंग केला. सरळगाव परिसराला झोडपलेटोकावडे : मुरबाड, सरळगाव आणि भोवतालच्या परिसराला शुक्रवारच्या पावसाने दोन तास झोडपले. शिवळे, नेवाळपाड, खुटल, आबेला, उमरोली, टोकावडे, इंदे या परिसराला पावसाचा फटका बसला. या पावसाने परिसरातील लग्नाच्या हळदी समारंभातील जेवणाचे हाल झाले. शिडकाव्यानंतर प्रचंड उकाडाडोंबिवली : कल्याण-डोंबिवलीतही शुक्रवारी रात्री पावसाने हजेरी लावली. ढगांच्या गडगडाटासह विजाही चमकल्या. वातावरणात काही वेळ गारवा होता. वाऱ्याचा वेग फार नसल्याने कुठेही नुकसान झाले नाही. पण पावसाला सुरुवात होताच कल्याण, डोंबिवलीतील वीजपुरवठा खंडीत झाला होता. तो दीड ते दोन तासानंतर सुरळीत झाला. शनिवारीही दिवसभर वातावरण ढगाळ होते. सकाळी काही काळ पावसाचा शिडकावा झाला, त्यानंतर उकाड्यात प्रचंड वाढ झाली. भिवंडीत सहा जखमी : भिवंडी : शुक्रवारी रात्री पडलेल्या पावसाच्या तडाख्याने भिवंडीत ठिकठिकाणी झाडे कोसळली. कल्याण रोड नवीवस्ती येथे घराची भिंत दुसऱ्या घरावर कोसळून सहा जण किरकोळ जखमी झाले. वाऱ्यामुळे गौरीपाडा, खंडूपाडा, समरूबाग, ब्राह्मणआळी, रिमांड होम, टेमघर, बाला कंपाऊण्ड, दर्गा रोड आदी ठिकाणी २२ झाडे कोसळली. त्यातील काही रस्त्यात पडल्याने वाहनचालकांना मार्ग बदलावा लागला. रात्री उशिरापर्यंत अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापनाने ही झाडे बाजूला करून रस्ते मोकळे केले. अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाल्याने शहर दीर्घ काळ अंधारात होते.
बत्ती गुल, घामाच्या धारा
By admin | Published: May 14, 2017 2:37 AM