ऑनलाइन लोकमतअमरावती, दि. 12 - उत्तुंग चार भिंतीच्या आत म्हणजे कारागृहात सूर्योदय ते सूर्यास्त अशी बंदीजनांची दिनचर्या ठरलेली आहे. मात्र, ज्या हातांना गुन्हेगारीचा कलंक लागला त्याच हातांनी तयार केलेल्या एलईडी दिव्यांचा ‘प्रकाश’ आता सर्वदूर पोहोचला आहे. अमरावती मध्यवर्ती कारागृहात बंदीजनांनी तयार केलेल्या एलईडी दिव्यांची प्रदर्शनी गुरूवार १३ आॅक्टोबर रोजी मुंबई येथील मंत्रालयात आयोजित करण्यात आली आहे राज्यातील कारागृहांमध्ये बंदीसुधारणा व पुनर्वसनांंतर्गत विविध उपक्रम राबविले जातात. कैद्यांमधील सुप्त गुणांना वाव देताना रोजगार निर्मितीला प्राधान्य देण्यासाठी कारागृह प्रशासन कार्यरत आहे. याच पार्श्वभूमिवर वर्धा येथील ‘एमगिरी’ च्या पुढाकाराने अमरावती मध्यवर्ती कारागृहात दीड वर्षांपूर्वी एलईडी दिवे निर्मितीचा प्रकल्प सुरु करण्यात आला. प्रारंभी १० बंदीजनांना एलईडी दिवे बनविण्याचे प्रशिक्षण घेतले. बंदीजनांच्या हातून तयार होणारे एलईडी दिवे हे ब्राण्डेड कंपन्यांना मागे टाकणारे ठरले. परिणामी राज्याच्या कारागृह महानिरीक्षकांनी अमरावतीत बंदीजनांद्वारे तयार केल्या जाणाऱ्या एलईडी दिव्यांचा पुरवठा संपूर्ण राज्यभरातील कारागृहात करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार राज्यभरातील निम्म्या कारागृहात पसरलेला ‘प्रकाश’ हा अमरावती येथील कैद्यांनी तयार केलेल्या एलईडी दिव्यांचा आहे. एलईडी दिव्यांची मागणी वाढत असल्यामुळे अमरावती मध्यवर्ती कारागृहात एलईडी दिवे निर्माण करण्याचे दोन युनिट सुरू करण्यात आले आहे. अलिकडे १२ कैदी एलईडी दिवे तयार करण्याचे काम करीत असून नऊ बंदीजनांनी एलईडी दिवे तयार करण्याचे नव्याने प्रशिक्षण घेतले आहे. एलईडी दिवे तयार करण्याच्या उपक्रमापासून बंदीजनांना रोजगाराचे दालन उपलब्ध झाले आहे. एलईडी दिवे तयार करणारे राज्यातील पहिले मध्यवर्ती कारागृह असल्याचा बहुमान अमरावतीला मिळाला आहे. राज्य शासनाने देखील या स्तुत्य उपक्रमाची दखल घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बंदीजनांनी तयार केलेल्या विविध साहित्य, वस्तुंची प्रदर्शनी थेट मंत्रालयात भरविण्याचे ठरविले आहे. त्यानुसार अमरावती मध्यवर्ती कारागृहात तयार होणाऱ्या एलईडी दिव्यांना त्यात प्राधान्यक्रम मिळाला आहे. १३ आॅक्टोबर रोजी मंत्रालयात आयोजित प्रदर्शनीकरिता कारागृहातील कर्मचारी सुधाकर मालवे हे एलईडी दिवे घेऊन गेले आहेत. एलईड दिव्यांच्या निर्मितीसाठी लागणारे विविध साहित्य बंद्यांना पुरविण्याची जबाबदारी तुरूंगाधिकारी माया धतुरे या यशस्वीपणे हाताळत आहेत. गडचिरोली ते मुंबईचे आॅर्थर रोड कारागृहांत एलईडी दिव्यांचा पुरवठा करण्यासाठी अधीक्षक भाईदास ढोले, वरिष्ठ तुरूंगाधिकारी अशोक जाधव सतत प्रयत्नशिल आहेत.बंद्यांच्या एलईडी दिव्यांना राजाश्रयाची गरजमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरूवारी मुंबई येथे मंत्रालयात आयोजित प्रदर्शनीचे उद्घाटन करणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री अमरावती मध्यवर्ती कारागृहात बंदीजनांनी साकारलेल्या एलईडी दिव्यांची पाहणी देखील करतील. एलईडी दिव्यांचा वापर वाढावा, ही काळाची गरज आहे. मात्र बंदीजनांनी तयार केलेल्या एलईडी दिव्यांना शासनाकडून मार्केटिंगची नितांत आवश्यकता आहे. बंदीजनांच्या एलईडी दिव्यांना राजाश्रय मिळाला की कारागृहात रोजगाराचे मोठे दालन मिळेल, हे वास्तव आहे.‘‘ बंदीजन एलईडी दिवे साकारत असल्याचा पहिला उपक्रम अमरावतीत सुरु करण्यात आला आहे. एलईडी दिव्यांची मागणी वाढत असल्यामुळे नव्याने दुसरे युनिटदेखील प्रारंभ झाले आहे. हा उपक्रम बंदीजनांच्या रोजगारासाठी अतिशय महत्त्वाचा ठरला आहे.-भाईदास ढोले अधीक्षक, मध्यवर्ती कारागृह अमरावती.
कैद्यांद्वारे निर्मित ‘एलईडीं’चा सर्वदूर ‘प्रकाश’
By admin | Published: October 12, 2016 7:02 PM