पिंपरी : शिवाजीनगर ते हिंजवडीदरम्यान लाइट रेलची (एलआरटी) सेवा सुरू करण्याबाबत पुणे महापालिकेकडून प्रक्रिया सुरू करण्यात आली असतानाच ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मार्गावर लवकरात लवकर मेट्रो सुरू करण्याचे सुतोवाच गुरूवारी पुण्यात एका कार्यक्रमात केले आहे. त्यामुळे या मार्गावर एलआरटी होणार की मेट्रो याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. शिवाजीनगर ते हिंजवडीदरम्यान लाइट रेलची (एलआरटी) सेवा सुरू करण्याबाबत महापालिकेस एका बड्या कंपनीने पुणे महापालिकेस सहकार्य करण्याची तयारी दर्शविली असून त्यानुसार, या कंपनीने दोन महिन्यांपूर्वी सादरीकरणही केलेले आहे. महापालिकेकडून २0१२मध्ये मेट्रोसाठीचा अहवाल तयार केल्यानंतर हिंजवडीसाठी लाईट रेल अथवा कोलकता येथील ट्रॉमच्या धर्तीवर प्रवाशी वाहतुकीसाठी सेवा सुरू करण्याबाबत हालचाली सुरू करण्यात आल्या होत्या. त्यानुसार, प्राथमिक सर्वेक्षण करून अहवाल तयार करण्याचे काम जपान इंटरनॅशनल को-आॅपरेशन एजन्सीच्या साहाय्याने सुरू करण्यातही आले होते. हा मार्ग पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या हद्दीतून जातो. त्यामुळे या तीनही संस्थांतर्फे तो हाती घेणे शक्य आहे का, हे तपासून पाहण्या बरोबरच या तीनही संस्थांच्या अनेक बैठकाही झालेल्या आहेत. या प्रकल्पासाठी कोणी खर्च करावयाचा याबाबत एकमत तसेच निर्णय होत नसल्याने हा प्रस्ताव गेल्या तीन वर्षांपासून बारगळला होता. मात्र, काही महिन्यांपूर्वी एका उद्योजक कंपनीने या मार्गाचे सर्वेक्षण करून लाईट रेलच्या प्रकल्पाबाबत सादरीकरण केले होते. त्यानंतर महापालिकेने या कंपनीकडून या सादरीकरणाचा अहवाल मागविण्यात आला असून, त्यानुसार, या लाईट रेलचा डीपीआर तयार केला जाणार आहे. या डीपीआरसाठी सल्लागार नेमण्याची प्रक्रियाही महापालिका प्रशासनाने सुरू केली आहे. त्यातच मुख्यमंत्री फडणवीस यांच्या या वक्त्यव्यामुळे या मार्गावर नेमका कोणता प्रकल्प सुरू होणार याबाबत संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे.मेट्रोसाठी वेळ लागण्याची शक्यता ?-शिवाजीनगर ते हिंजवडी या मार्गावर मेट्रो प्रकल्प उभारावयाचा झाल्यास त्यासाठी लाईट रेल उभारण्यापेक्षा जादा वेळ व पैसा खर्च होण्याची शक्यता आहे. या शिवाय महापालिकेच्या पहिल्या दोन टप्प्यातील मेट्रो प्रकल्पाचा अहवाल तयार करणे आणि त्याला राज्य शासन तसेच केंद्र शासनाची मान्यता मिळविणे यासाठीचा प्रवास गेल्या अर्ध्या तपापासून सुरू आहे. या मान्यतांच्या फेऱ्यात प्रकल्पाचा खर्च दररोज दोन कोटी रुपयांनी वाढत आहे. अशा स्थितीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकल्पाचे काम तत्काळ हाती घेण्याचे वक्तव्य केले असले तरी, पहिल्या प्रकल्पाचे भिजते घोंगडे पाहता हा मार्गही वेळखाऊ तसेच मोठा खर्चिक ठरण्याची शक्यता आहे. त्या तुलनेत रस्त्यावरून धावणारी लाईट रेल महापालिकेस कमी खर्चात तसेच कमी वेळेत उभारणे शक्य असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. सध्या प्रस्तावित असलेल्या वनाज ते रामवाडी आणि स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड या दोन मार्गांना गेल्या तीन वर्षांपासून केंद्राची मान्यता मिळत नसल्याने या मार्गाचे भवितव्यही खडतर असल्याचे तज्ज्ञ सांगतात.असा आहे लाईट रेल प्रकल्प -हिंजवडी ते शिवाजीनगर हा लाईट रेलसाठीचा सुमारे २१.६० किलोमीटरचा मार्ग आहे. त्यासाठीच्या प्रकल्पास जवळपास ५ हजार ७११ कोटींचा खर्च अपेक्षीत आहे. त्यातील ६.३५ किलोमीटरचा मार्ग पुणे महापालिकेच्या हददीतून जातो. शिवाजीनगर पासून औंध येथील सार्वजनिक बांधकाम विभागा पर्यंतचा भाग पुणे महापालिकेच्या हददीत येतो. या प्रकल्पानुसार, शिवाजी नगर ते हा मार्ग पुलावरून तर त्या पुढील मार्ग हा जमीनीवरून असणार आहे. या प्रकल्पासाठी प्रतिकिलोमीटर 270 कोटी रूपये खर्च अपेक्षीत आहे. मात्र, या प्रकल्पात तीन संस्था असल्याने कोण किती खर्चाचा भार उचलणार याबाबत अद्याप चर्चाच सुरू आहे.या मार्गावर लाईट रेलसाठी महापालिकेस एका कंपनीने सादरीकरण केले आहे. त्यानुसार, लवकरच या प्रकल्पाचा डीपीआर तयार केला जाईल. या शिवाय मेट्रोबाबतच्या पर्यायाची चाचपणीही केली जाईल. त्यानुसार, मेट्रोसाठीचा डीपीआरही तत्काळ करण्यासाठी प्रयत्न केले जातील. - कुणाल कुमार (आयुक्त, पुणे महापालिका)
हिंजवडीला मेट्रो की लाईट रेल?
By admin | Published: June 13, 2015 11:43 PM