मुंबई : मागील काही दिवसांपासून मुंबईसह महाराष्ट्रात पावसाने विश्रांती घेतली असली, तरी १२, १३, १४ आणि १५ सप्टेंबर रोजी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पाऊस कोसळेल, असा इशारा भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिला आहे. मुंबईत मात्र, पावसाच्या तुरळक सरी कोसळतील, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला आहे.
गेल्या २४ तासांत विदर्भात काही ठिकाणी मुसळधार तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी पाऊस पडला आहे. हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, १२ सप्टेंबर रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. १३ सप्टेंबर रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार, तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. १४ सप्टेंबर रोजी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. १५ सप्टेंबर रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल.
श्रावण महिन्यात पावसाने मुंबईत काहीसा जोर धरला होता. मात्र, श्रावण महिना संपल्यानंतर पावसाने उघडीप घेतली आहे. चारएक दिवसांपूर्वी पूर्व उपनगरात पडलेला पाऊस वगळता, शहरासह उपनगरात पावसाने उसंत घेतली आहे. शहरासह उपनगरावर केवळ ढग दाटून येत असून, पावसाचा मात्र काहीच पत्ता नाही. दरम्यान, १२ आणि १३ सप्टेंबर रोजी मुंबईत पावसाच्या तुरळक सरी कोसळतील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे २९, २५ अंशाच्या आसपास राहील, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला आहे.