मुंबई : सौरकृषी पंपाच्या अंमलबजावणीसाठीचे पैसे वसूल करण्यासाठी राज्य सरकारने विजेच्या विक्रीवर आकारण्यात येणाऱ्या विद्युत शुल्कात प्रतियुनिट दहा पैशांची वाढ केली आहे. मुंबईत बेस्ट, अदानी, टाटाच्या घरगुती आणि व्यवसायिक, औद्योगिक, तसेच महावितरणच्या व्यावसायिक व औद्योगिक वीजग्राहकांना याचा फटका बसणार आहे. राज्य सरकारच्या आदेशानुसार फेब्रुवारी महिन्यात येणारी जानेवारी महिन्याची वीजबिले वाढीव दराने येणार आहेत.
विजेच्या विक्रीवर आकारण्यात येणाºया विद्युत शुल्कात राज्य सरकारने प्रतियुनिट दहा पैशांची वाढ केली आहे. तसे आदेशच राज्य सरकारने दिले आहेत. १ जानेवारी, २०१९ पासून विद्युत शुल्क वाढ लागू झाली आहे. वीजग्राहकांना फेब्रुवारी महिन्यात येणारे जानेवारी महिन्याचे वीजबिल वाढीव येणार आहे. बेस्ट, टाटा आणि अदानीच्या व्यावसायिक वीजग्राहकांना यापूर्वी २४.०४ पैसे विद्युत शुल्क आकारले जात होते. आता यात प्रति युनिट दहा पैशांची वाढ झाली आहे. परिणामी, विद्युत शुल्क ३४.०४ पैसे आकारले जाईल. निवासी वीजग्राहकांना यापूर्वी १६.४ पैसे विद्युत शुल्क आकारले जात होते. आता यात प्रतियुनिट दहा पैशांची वाढ झाली आहे. परिणामी, विद्युत शुल्क २६.०४ पैसे आकारले जाणार आहेत.
वीज क्षेत्रातील तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, केंद्र सरकारच्या दबावामुळे राज्य सरकारला सौरकृषी पंप योजना राबवायची आहे. मात्र, राज्याकडे यासाठी पैसा नाही. राज्याकडे पैसा नसल्याने ते कुठून निर्माण करायचे; हा प्रश्न राज्याला पडला आहे. राज्याने यासाठी विद्युत शुल्कात दहा पैसे वाढ केली आहे. परिणामी, दर महिन्याला राज्याला वाढीव विद्युत शुल्काच्या दहा पैशातून नऊशे ते एक हजार कोटी रुपये मिळतील, मुळात हे वीज वापरावर अवलंबून आहे.