जुन्नर : शहरातील पथदिवे एलईडी दिव्यांनी उजळणार असून, यासाठी जवळपास ५० लाखांची तरतूद केली आहे. ३३ कोटी ६६ लाख ३८ हजार १०० रुपयांची जमेची तरतूद असणाऱ्या नगरपालिकेच्या वार्षिक सन २०१७-२०१८च्या अर्थसंकल्पाला सभेत सर्वानुमते मंजुरी दिली. या अर्थसंकल्पात कोणत्याही प्रकारची करवाढ नागरिकांवर लादलेली नसल्याने नागरिकांनी सुटकेच्या निश्वास सोडला. शहराच्या विकासाला गती देणारा हा अर्थसंकल्प असल्याचे नगराध्यक्ष श्याम पांडे यांनी सांगितले.धर्मवीर संभाजीमहाराज सभागृहात सभेत एकमताने मंजुरी दिली. उपनगराध्यक्ष अलका फुलपगार, गटनेते दिनेश दुबे, आघाडीचे गटनेते जमीर कागदी, नगरसेवक समीर भगत, अविन फुलपगार, फिरोज पठाण, भाऊसाहेब कुंभार, अविनाश करडिले, नितीन गांधी, नगरसेविका सुवर्णा बनकर, अंकिता गोसावी, वैष्णवी गवळी, सना मन्सूरी, हजरा इनामदार, समिना शेख उपस्थित होते. चिकनविक्रेते, मटणविक्रेते व मासेविक्रेते यांना प्रतिमहिना ३०० रुपये भाडे लागू करून नगरपालिका हद्दीत विनापरवाना अशी दुकाने सुरु करणाऱ्यांवर कारवाई करावी, पर्यावरण संवर्धनासाठी प्लॅस्टिक कॅरीबॅगबंदी, बेकायदेशीर फ्लेक्स बोर्ड यावर कायदेशीर कारवाई करण्याचा ठराव मंजूर केला. भटक्या जनावरांचा त्रास कमी करण्यासाठी आरक्षित जागेवर जनावरांसाठी कोंडवाडा उभारण्यास मंजुरी दिली.अर्थसंकल्पात १२ कोटी ५४ लाख १०० रुपये तसेच भांडवली जमा २१ कोटी १२ लाख रुपये असे एकूण ३३ कोटी ६६ लाख ३८ हजार १०० रुपये जमा बाजूला दाखविण्यात आले आहेत. एकूण महसुली खर्च १४ कोटी १२ लाख १८ हजार रुपये, तर भांडवली खर्च २४ कोटी ४ लाख ८६ हजार रुपये असा एकूण ३८ कोटी ६० लाख ७८ हजार रुपये खर्च बाजूला दाखविण्यात आला आहे.बंदअवस्थेत असलेला जलतरण तलाव तातडीने दुरुस्त करावा, तसेच पाणीपट्टीत कोणत्याही प्रकारची वाढ करण्यात आली नसून लवकरच शहरात मीटर पद्धतीने पाणीपुरवठा करावा, असा ठराव मंजूर केला. शहरात बेकायदेशीर होत असलेल्या जनावरांच्या कत्तली रोखण्यासाठी शासनाच्या निकषाप्रमाणे सुधारित कत्तलखान्यासाठी २५ लाखांची तरतूद करण्याची मागणी आघाडीचे गटनेते जमीर कागदी यांनी केली होती.
जुन्नरमधील पथदिवे एलईडींनी उजळणार
By admin | Published: March 04, 2017 1:11 AM