तलासरी : उधवा भागात असलेल्या अवैध खदानी मुळे परिसरातील वीज खांब व वीज वाहिन्या धोकादायक झाले असून ते कधीही कोसळून वित्त तसेच जीवित हानी होण्याची शक्यता आहे. या अवैध खदानी बाबत तलासरी महसूल विभागाला वारंवार तक्र ार करूनही कोणतीही कारवाई करीत नसल्याने ग्रामस्थ जीव मुठीत धरून परिसरात वावरत आहेत.उधवा भगात मोठ्या प्रमानात अवैध खाणी असून त्यात स्फोटकांचा वापर दिवसरात्र होत असल्याने या भागातील घरांना, विहिरींना तडे गेले आहेत. तसेच खाणींची व्याप्ती वाढत असल्याने या भागातून गेलेले विद्युत खांब व वाहिन्या डळमळीत झाले आहेत. पावसाळ्यात कधीही विद्युत खांब पडून विद्युत पुरवठा खंडित होऊ शकते तसेच जीवित हानी होऊ शकते.या अवैध खाणींबाबत तलासरी पंचायत समितीचे उपसभापती भानुदास भोये तसेच ग्रामस्थ हरेश धर्मा शिंदा यांनी तलासरी तहसीलदार व उपविभागीय अधिकारी डहाणू यांच्याकडे तक्रार करूनही कारवाई करण्यात चालढकल होत असल्याने महसूल विभागाबाबत ग्रामस्थांमध्ये शंका निर्माण होत आहे. तलासरी परिसरातील खाणीत होणाऱ्या स्फोटकांच्या अवैध वापराबाबत महसूल विभागाकडे विचारणा केली असता चौकशी करून कारवाई करण्यात येईल असे सांगण्यात आले. मात्र, ना चौकशी ना कारवाई झाली यामुळे जनतेला मात्र जीव मुठीत धरून वावरावे लागत आहे. (वार्ताहर)>खाणींमुळे विद्युत खांब व वाहिन्या धोकादायक झाल्या असून संबंधितांना नोटिसा बजावण्यात येतील.- सचिन भांगरे, उपविभागीय अधिकारी, महावितरण कार्यालय तलासरी.
उधव्यात वीज खांब, वाहिन्या धोकादायक
By admin | Published: June 13, 2016 3:30 AM