पुणे : बालेवाडी येथील पार्क एक्स्प्रेस या इमारतीच्या १४व्या मजल्याचा स्लॅब टाकताना हलक्या प्रतीचे सेंट्रिंगचे साहित्य वापरण्यात आले असून, स्लॅब टाकण्यासाठी आवश्यक असलेले परवाने न घेता बांधकाम केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी अटक केलेल्या चौघांच्या पोलीस कोठडीत ४ आॅगस्टपर्यंत वाढ करण्यात आली आहे़ भाविन हर्षद शहा (वय ३४, रा. कोंढवा), संतोष सोपान चव्हाण (वय ३५, रा. आकुर्डी), ज्ञानेश्वर लक्ष्मण चव्हाण (वय ३५, रा. नवी सांगवी), श्रीकांत किसन पवार (वय ४४, रा. कात्रज) अशी त्यांची नावे आहेत.बालेवाडी येथील पार्क एक्स्प्रेस या इमारतीच्या १४व्या मजल्याचा स्लॅब कोसळून त्यात ९ मजूरांचा मृत्यू झाला होता़ याप्रकरणी चौघांना चतु:शृंगी पोलिसांनी अटक केली होती़ त्यांची पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने त्यांना मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपींकडे पोलीस कोठडीत करण्यात आलेल्या तपासात चौदावा स्लॅब टाकताना सेंट्रिंगचे साहित्य हलक्या प्रतीचे वापरल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच, स्लॅब टाकताना आवश्यक असलेले परवाने न घेता कामगार आणि मजुरांच्या सुरक्षेविषयी काळजी घेतली नसल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी अधिक तपास करण्यासाठी आरोपींना पोलीस कोठडी देण्यात यावी, असा युक्तिवाद सरकारी वकील चैत्राली पणशीकर यांनी केला. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन. एस. सराफ यांनी त्यांच्या पोलीस कोठडीत ४ आॅगस्टपर्यंत वाढ केली आहे.>अरविंद प्रेमचंद जैन (वय ४४, रा. प्राइड पॅराडाईज, मॉडेल कॉलनी, शिवाजीनगर), श्रवण देवकीनंदन अगरवाल (वय ४५, रा़ पाषाण), श्यामकांत जगन्नाथ वाणी शेंडे (सणस मेमरीज, शिवाजीनगर) आणि कैलास बाबुलाल वाणी (गोपाळ पार्क, एरंडवणे) यांनी अर्ज दाखल केला आहे. अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून चौघांनी दाखल केलेल्या अर्जावर बुधवारी सुनावणी होणार आहे.
स्लॅब टाकताना वापरले हलक्या प्रतीचे साहित्य
By admin | Published: August 03, 2016 12:40 AM