Nana Patole Congress, Vidhan Sabha Elections 2024: लोकसभा निवडणुकीत जनता काँग्रेस व इंडिया आघाडीच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहिली. विधानसभेची निवडणूक तीन महिन्यावर आली आहे. लोकसभेत चांगले यश मिळाले म्हणून गाफील राहू नका. विधानसभा निवडणुकीसाठीही मेहनत करा, जनतेपर्यंत जा व काँग्रेस व महाविकास आघाडीची सत्ता आणण्यासाठी काम करा, असे कानमंत्र महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिला. काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवनमध्ये प्रदेश काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाची आढावा बैठक झाली. या बैठकीत त्यांनी हे आवाहन केले.
नाना पटोले म्हणाले, "काँग्रेस सर्व जातीधर्मांना सोबत घेऊन काम करणारा पक्ष आहे. लोकसभा निवडणुकीत देशभरातील विविध पक्षांनी एकत्र येऊन इंडिया आघाडी स्थापन केली व राज्यात महाविकास आघाडीने एकत्र निवडणूक लढवली. लोकसभा निवडणुकीत दलित, मागास, आदिवासी, अल्पसंख्याक समाज, महिला, तरुणांचा कौल इंडिया आघाडीला मिळाला व आता राज्यातही परिवर्तन व्हावे ही जनतेची भावना आहे, आपण जनतेपर्यंत जाऊन काँग्रेसचा विचार पोहचवला पाहिजे."
"भारतीय जनता पक्ष धार्मिक तेढ निर्माण करून राजकीय पोळी भाजण्याचे राजकारण करत आहे. भाजपा देश तोडण्याचे काम करत असताना राहुल गांधी मात्र देश जोडण्याचे काम करत आहेत. संघटनेसाठी काम करणाऱ्यांची दखल देऊन त्यांना योग्य ती संधी दिली जाते. पक्षासाठी काम करा व विधानसभेवर काँग्रेसच्या विजयाची पताका फडकवा," असे नाना पटोले म्हणाले.