मुंबई : मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना आता रोज सकाळी एक तास उशिराने कामावर येण्याची मुभा असेल, पण ते जितक्या उशिराने कामावर येतील तितके जास्त काम त्यांना सायंकाळी ५.३० नंतर करावे लागेल. १ जानेवारीपासून या आदेशाची अंमलबजावणी होणार आहे. मंत्रालय कर्मचाऱ्यांनी सकाळी ९.४५ला कामावर हजर राहावे, असा नियम आहे. त्यांना आतापर्यंत १० मिनिटांचा ग्रेस पीरिअड दिला जायचा. दोन दिवस १० मिनिटांहून जास्त वेळ झाला तर तिसऱ्या उशिरास एक नैमित्तिक रजा आतापर्यंत कापली जात होती. सामान्य प्रशासन विभागाने बुधवारी एक आदेश काढून या नियमात बदल केला. आता सकाळी ९.४५ ते १०.४५ या वेळात कर्मचारी, अधिकाऱ्यांना केव्हाही कामावर येता येईल. मात्र या वेळात ते जितकी मिनिटे उशिराने येतील तितकी मिनिटे त्यांना सायंकाळी ५.३० ला कामाची नियमित वेळ संपल्यानंतर काम करावे लागेल. मुंबईतील कर्मचाऱ्यांना दूरवरून मंत्रालयात यावे लागत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. (विशेष प्रतिनिधी)
मंत्रालय कर्मचाऱ्यांना आजपासून तासभर उशिरा येण्याची मुभा
By admin | Published: January 01, 2015 3:31 AM