- यदु जोशी, नागपूरराज्यात डान्सबारना परवाने देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले असले, तरी अत्यंत जाचक अटी टाकून परवाने देण्याचा प्रस्ताव सरकारपुढे असल्यामुळे या अटींची पूर्तता करताना बार मालकांची चांगलीच दमछाक होणार आहे.राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात बाजू नीट न मांडल्यामुळे डान्सबारना परवाने मिळण्याचा मार्ग मोकळा झाला, असा आरोप विरोधकांकडून होत आहे. या आरोपला उत्तर म्हणून डान्सबारच्या परवान्याच्या अटी अधिक जाचक करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या संदर्भात गृह विभागाचे प्रधान सचिव विजय सतबीरसिंग यांनी डान्सबारच्या परवान्यांसाठीच्या नव्या नियमांचा प्रस्ताव सरकारकडे पाठविला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रस्तावात अनेक जाचक अटींचा अंतर्भाव आहे.डान्सबारमध्ये चालणारी छमछम सीसीटीव्हीमध्ये कैद होणार असून, त्याचे कनेक्शन जवळच्या पोलीस ठाण्यात असेल. डान्सबारमध्ये काय सुरू आहे, यावर पोलीस ठाण्यात बसल्या जागी नजर ठेवता येईल. दुसरा पर्याय असाही असेल की, डान्सबारमधील कोणत्याही वेळचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना बघता येईल. सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा फोकस कोणत्या ठिकाणी असेल हे पोलीस ठरवतील, तसेच डान्सबार हा सीसीटीव्ही यंत्रणेखाली असल्याचा बोर्ड ठळकपणे डान्सबारबाहेर लावावा लागेल. बारबालांचे वय १८ वर्षांपेक्षा जास्त असणे अनिवार्य राहील. त्यांचे रेकॉर्ड बार मालकांना ठेवावे लागेल. त्यांना नियमित वेतन/मानधन/भत्ते द्यावे लागतील. त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. त्यांना साप्ताहिक सुट्टी द्यावी लागेल. बारबालांना कामगार कायद्याचे संरक्षण देण्याचा प्रस्ताव कामगार विभागाकडेच पाठविण्यात आला आहे. अशा असतील अटी- डान्सबारमध्ये सीसीटीव्हा अनिवार्य.- बारबालांवर पैसे उधळता येणार नाहीत.- स्टेजवर एका वेळी चारपेक्षा अधिक बारबाला हजर नसतील.- स्टेज आणि प्रेक्षक यांच्यात विशिष्ट सुरक्षित अंतर ठेवावे लागेल.- प्रेक्षकांपैकी कोणालाही स्टेजवर जाता येणार नाही.- नर्तकींना अश्लील वा बीभत्स हावभाव करता येणार नाही. - पाच ग्राहकांच्या टेबलमागे एक पार्किंगची जागा बारमालकास ठेवावी लागेल.- डान्स बारमध्ये धूम्रपान करता येणार नाही.- पोलीस या बारवर कधीही छापे टाकू शकतील.
डान्सबारवर सक्तीची ‘मर्यादा’!
By admin | Published: December 15, 2015 1:43 AM