लोहारा (जि. उस्मानाबाद): अतिवृष्टीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. संपूर्ण जमीनच खरवडून गेल्याचे अनेक ठिकाणी दिसले. हे नुकसान एका दिवसात भरुन येणारे नाही. मात्र, मदतीसाठी राज्य सरकारला काही मर्यादा आहेत. त्यामुळे केंद्रानेही मदत केली पाहिजे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.शरद पवार अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आज उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. सकाळी त्यांनी तुळजापूर व लोहारा तालुक्यातील परिस्थितीची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधताना त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. ही परिस्थिती उस्मानाबादसोबतच महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी निर्माण झाली आहे. शक्य तितकी व लवकर मदत देण्यासाठी आपण पाठपुरावा करणार आहोत. परंतु, नुकसानीचे प्रमाण लक्षात घेता एकटे राज्य सरकार पुरणार नाही. त्यासाठी केंद्राचीही मदत घ्यावी लागणार आहे. आम्ही लवकरच पंतप्रधानांची भेट घेऊन याविषयी चर्चा करू, असे आश्वासन पवार यांनी शेतकऱ्यांना दिले. यावेळी राज्यमंत्री संजय बनसोडे, माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, खा. ओमराजे निंबाळकर, आ. ज्ञानराज चौगुले उपस्थित होते.
भूकंपावर मात केलीय, यातूनही सावरू- पवारलोहारा, उमरगा तालुक्यातील भूकंपग्रस्त भागातही अतिवृष्टीने मोठे नुकसान झाले आहे. येथील शेतकऱ्यांचे मनोबल वाढवताना पवार म्हणाले, १९९३च्या भूकंपात या भागातील हजारो जीव गेले. हे दु:ख विसरुन आपण उभे राहिलो आहोत. त्याचप्रमाणे याही संकटातून उभे राहू, तुम्ही धीर धरा, आपण नक्की मार्ग काढू, असा शब्द पवारांनी शेतकऱ्यांना दिला.