CM Eknath Shinde ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाविकास आघाडीमध्ये अटीतटीचा सामना रंगत आहे. त्यामुळे मतांची गोळाबेरीज करण्यासाठी राजकीय नेत्यांकडून शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न सुरू आहेत. अशातच लिंगायत आणि बंजारा समाजातील दोन संघटनांचा पाठिंबा मिळवण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यश आलं आहे. मुंबई महानगर , ठाणे जिल्हा, नवी मुंबई आणि नाशिकमध्ये वीरशैव- लिंगायत समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या शरण संकुल ट्रस्ट संघटनेनं महायुतीला पाठिंबा जाहीर केला आहे. तसंच राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या पंडित राठोड यांनीही आपण लोकसभा निवडणुकीत महायुतीचे समर्थन करत असल्याचं जाहीर केलं आहे. वीरशैव लिंगायत समाजातील तरुणांमध्ये उद्योजक घडवण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या जगतज्योती श्री संत महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळचे गठन केल्याबद्दल महाराष्ट्रातील वीरशैव लिंगायत समाजातर्फे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नुकतेच आभार व्यक्त करण्यात आले. यावेळी कोल्हापूर येथील लिंगायत समाजाचे नितीन पाटील, नवी मुंबई वीरशैव लिंगायत समाजाच्या शरण संकुल ट्रस्टचे अध्यक्ष श्री रामलिंगय्या स्वामी, ठाणे जिल्हाचे सचिव विश्वनाथ महांतशेट्टर, खारघर येथील आनंद गवी तसेच कल्याण, डोंबिवली, अंबरनाथमधील इतर वीरशैव-लिंगायत समाजाचे प्रमुख पदाधिकारी आणि समाजबांधव यांच्यासह मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे देखील उपस्थित होते.
बंजारा परिषदेच्या पत्रकात काय म्हटलं आहे?
बंजारा राष्ट्रीय परिषदेचे राष्ट्रीय महासचिव पंडित राठोड यांनी एक पत्रक काढत महायुतीला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. शिवसेना खासदार आणि कल्याण डोंबिवलीतील महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांना लिहिलेल्या या पत्रकात म्हटलं आहे की, "आपल्या मतदार संघामध्ये गोरबंजारा समाज मोठ्या प्रमाणात असून एक गठ्ठा मतदानासाठी गोरबंजारा समाज हा अत्यंत निर्णायक व प्रभावी आहे. गोरबंजारा समाजामुळे आपल्या विजयाचा मार्ग सोपा होणार आहे व मताधिक्य वाढणार आहे. गोरबंजारा समाजामध्ये अखिल भारतीय स्तरावर राष्ट्रीय बंजारा परिषद ही सर्वात मोठी संघटना असून या संघटनेमध्ये समाजातील धार्मिक, राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या प्रमाणात आहेत. गोरबंजारा समाजातील सर्व तांडे धर्मपीठाशी राष्ट्रीय बंजारा परिषदेमुळे जोडले गेल्याने तांडा स्तरावरील नायक, कारभारी, पुजारी व गोरबंजारा समाजाचे, तांडा समिती नायकण, महिला समिती, युवा धर्म रक्षक, गोरबंजारा धर्मपीठाचे पदाधिकारी, पालखीचे पदाधिकारी सर्व राष्ट्रीय बंजारा परिषदेशी निगडित आहेत. राष्ट्रीय बंजारा परिषद गोरबंजारा समाजाचे सर्वात मोठे नेटवर्क असलेली संघटना असून राष्ट्रीय बंजारा परिषदेमुळे आपल्या मतदारसंघात प्रचंड मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळून आपला विजय निश्चित होणार आहे," असा विश्वास राठोड यांनी व्यक्त केला आहे.