पुणे : युवकांना रोजगारासाठी राजकारण्यांकडे जाण्याची वेळ येऊ नये, उद्योगविश्वाशी त्यांची नाळ जोडली जावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी रविवारी येथे सांगितले.सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या लवळे (ता. मुळशी) येथील व्यवस्थापनशास्त्र शाखेच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी इराणी आल्या होत्या. खासदार अनिल शिरोळे, सिंबायोसिसचे कुलपती डॉ. शां.ब. मुजुमदार, कुलगुरू रजनी गुप्ते, उपाध्यक्ष डॉ. अरविंद संगमनेकर, संचालक विद्या येरवडेकर व्यासपीठावर होते.आपल्याला मिळालेल्या मंत्रिपदाकडे संधी म्हणून नव्हेतर, विकासाच्या शक्यतांच्या दृष्टिकोनातून पाहतो, असे सांगून इराणी म्हणाल्या, या मंत्रालयाच्या माध्यमातून मानवी विकासासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील याच्या कल्पना मांडल्या जाव्यात, यासाठी संकेतस्थळाच्या माध्यमातून व्यासपीठ निर्माण केले जाणार आहे. पुढील महिन्यात सिंबायोसिसच्या विद्यार्थ्यांना दिल्ली भेटीस येण्याचे निमंत्रणही इराणी यांनी दिले. आपल्या देशात शिक्षण परवानाराजमधून मुक्त नाही, अशी खंत व्यक्त करून डॉ. मुजुमदार यांनी देशातील एकतृतीयांश लोकसंख्या युवा असून, या वर्गाला योग्य शिक्षण मिळणे आवश्यक आहे, अशी अपेक्षा व्यक्त केली. सिंबायोसिसमध्ये शिकणाऱ्या येमेन, सुदान, अफगाण, कॅमेरून आदी देशांमधील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी पारंपरिक वेषभूषेत इराणी यांना त्यांच्या देशाच्या ध्वजाचे प्रतीक भेट दिले. (प्रतिनिधी)
युवकांची नाळ उद्योगविश्वाशी जोडणार
By admin | Published: June 16, 2014 4:01 AM