लोकमत न्यूज नेटवर्करहाटणी : शहरातील वाढती गुन्हेगारी, दिवसाआड खुनाचे प्रकार, महिलांची छेडछाड, वाहनांची तोडफोड यांसह अनेक प्रकारच्या गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यास पोलीस यंत्रणा हतबल झाली की काय असा प्रश्न पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना सातत्याने सतावत आहे़ मात्र, असे प्रकार दिवसेंदिवस घडत असताना मात्र पोलीस प्रशासन मूग गिळून गप्प बसल्याचेच दिसून येत आहे. कारण अवैध धंद्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी देऊनही वाकड पोलीस स्टेनच्या हद्दीत भर रस्त्यावर दारू पिण्याचे धाडस मद्यपी करताना दिसून येत आहे. त्यामुळे रस्त्याने ये-जा करणारे नागरिक, परिसरातील रहिवाशी कमालीचे वैतागले आहेत. या ठिकाणी महिलांना छेडछाडीचे प्रकार नित्याचेच झाले आहेत. त्यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये एक प्रकारे भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे या प्रकारात पोलीस प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. या परिसरात रस्त्यावर बसून दारू पिणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. धनगरबाबा मंदिरासमोरील रस्त्यावर दोन दारूचे दुकान आहेत. एक दुकान देशी दारूचे आहे, तर एक दुकान देशी व विदेशी दारूचे आहे. त्यामुळे या दुकानांच्या दोनशे ते तीनशे मीटर परिसरात रस्त्यावर बसून सर्रास दारू पिणारे बसलेले असतात. या परिसरात भांडणाचे प्रकार घडत आहेत. मात्र नागरिक तक्रार करूनही वाकड पोलीस याकडे कानाडोळा करीत असल्याचा आरोप येथील रहिवाशी करीत आहेत. या परिसरातील बीआरटीएस मार्गावर लाखो रुपये खर्च करून दोन अद्ययावत बसथांबे उभारण्यात आला आहेत. मात्र सध्या पावसाचे दिवस असल्याने याचा उपयोग सध्या दारू पिणारे करीत आहेत. या ठिकाणी उघड्यावर बसून दारू पिणाऱ्यांवर कारवाई का होत नाही, याचेही गौडबंगाल येथील नागरिकांनाच उलघडत नाही. संबंधित पोलीस स्टेशनचे पोलीस बघ्याची भूमिका का घेत आहेत. या सर्व प्रकरणाला पोलिसांचा छुपा पाठिंबा तर नाही ना अशी शंका नागरिक व्यक्त करीत आहेत. >पोलीस चौकी : तक्रारीकडे केले जाते दुर्लक्षभर रस्त्यावर राजरोसपणे वाहनचालक, रहिवाशी, ये-जा करणाऱ्या नागरिकांची पर्वा न करता मद्यपी दारू पीत बसतात. एखाद्याने त्यांना हटकलेच तर दादागिरीची भाषा त्यांना करतात याला काय म्हणायचे. काही स्थानिक नागरिकांनी त्यांना त्या ठिकाणाहून उठविण्याचा प्रकारही केला. मात्र, त्याचा काही परिणाम झाला नाही. अनेक वेळा वाकड पोलीस स्टेशन व काळेवाडी पोलीस चौकीला तक्रारी करूनही त्याचा उपयोग झाला नसल्याने नागरिक संभ्रमात आहेत.
‘बीआरटीएस’वर मद्यपींचा अड्डा
By admin | Published: July 13, 2017 1:41 AM