अहमदनगर : पांगरमल दारूकांडप्रकरणी ताब्यात असलेल्या याकुब शेखची डायरी पोलिसांच्या हाती लागली असून, त्यात जिल्हा रुग्णालयातील कँटीनमध्ये बनावट दारू तयार करणाऱ्या आरोपींची नावे तसेच त्यांच्याशी झालेल्या आर्थिक व्यवहाराचाही उल्लेख आहे़ याकुबच्या अवैध व्यवसायाशी संबंधित बहुतांशी जणांची नावे आणि संपर्क क्रमांकही त्यात असल्याने दारू रॅकेटच्या मुळापर्यंत पोहोचण्यास पोलिसांना डायरीची चांगलीच मदत होणार आहे़ पांगरमल दारूकांड प्रकरणी पोलीस याकुब शेखची कसून चौकशी करत आहेत़ पांगरमल येथे देण्यात आलेली देशी दारू कुठे तयार झाली होती़ ती जिल्हा रुग्णालयात कशी आली, दारूत टाकलेले मिथेनॉल कुणी पुरविले आणि पांगरमल येथे ही दारू कशी पोहोचली त्याचा पोलीस तपास करत आहेत़ न्यायालयीन कोठडी मिळालेल्या जाकीर शेख, जितू गंभीर, रावसाहेब आव्हाड, भीमराज आव्हाड व हमीद शेख यांना पुन्हा पोलीस कोठडी मिळावी, अशी मागणी पोलिसांनी जिल्हा न्यायालयाकडे केली होती़ याबाबत ८ मार्चला निर्णय होणार आहे़ (प्रतिनिधी)
याकुबच्या डायरीत दारू रॅकेटची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2017 4:26 AM