मुंबई : लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर मुंबई, रायगडप्रमाणे कोल्हापूरमध्येही मद्य विक्रीची मुभा उच्च न्यायालयाने सोमवारी दिली. मद्य विक्रीस मनाई करण्याबाबतचे परिपत्रक कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी २८ मार्च रोजी जारी केले होते. त्याला कोल्हापूर येथील मद्य विक्रेते केतन बसीन यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यांच्या याचिकेवरील सुनावणी न्या. मकरंद कर्णिक आणि न्या. कमल खाटा यांच्या सुटीकालीन खंडपीठापुढे सुरू होती.
मुंबई, रायगडप्रमाणे कोल्हापूरमध्येही लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर मद्य विक्रीस परवानगी द्यावी, अशी विनंती याचिकादाराने न्यायालयाला केली होती. न्यायालयाने याबाबत सरकारकडे विचारणा केली असता सरकारी वकील म्हणाले, की कोल्हापुरातील राजकीय पक्ष, नेते आणि त्यांचे कार्यकर्ते आक्रमक असल्याने निकालाचा संपूर्ण दिवस मद्य विक्री बंद ठेवण्याचे आदेश कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. न्यायालयाने सरकारी वकिलांचा युक्तिवाद मान्य न करता मुंबई, रायगडप्रमाणे कोल्हापूरमध्येही लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर मद्य विक्रीस परवानगी दिली.