गेल्या काही दिवसांपासून सांगलीमध्ये उद्धव ठाकरेंनी चंद्रहार पाटलांना परस्पर उमेदार जाहीर केल्यावरून काँग्रेसमध्ये नाराजी होती. काँग्रेसला प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांना उमेदवारी द्यायची होती. तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने कोल्हापूरची जागा काँग्रेससाठी सोडल्याचे सांगत सांगलीवर दावा केला होता. अशातच आता मुंबई दक्षिण मध्यवरून देखील महाविकास आघाडीत वाद उफाळून येण्याची शक्यता आहे.
ठाकरेंनी शड्डू ठोकलाच! सांगलीच्या चंद्रहार पाटलांसह १७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
सांगली लोकसभेसाठी भाजपने विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांची उमेदवारी जाहीर केली आहे. सांगली हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. त्यावर ठाकरे गटाने उमेदवार जाहीर केला आहे. यातच काल सायंकाळी मविआच्या मुंबईतील नेत्यांची लोकसभा मतदारसंघ आढावा बैठक होती. यामध्ये वर्षा गायकवाड यांनी मुंबईत काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद सारखीच आहे. यामुळे आम्हाला सन्मानपूर्वक जागा मिळाल्या पाहिजेत असे वक्तव्य केले होते. तसेच मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघातून पक्षाने आदेश दिला तर लोकसभा लढण्याचे संकेतही त्यांनी दिले होते.
परंतु आज सकाळी ठाकरे गटाने थेट उमेदवारच घोषित करून टाकल्याने मविआमध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघातून काँग्रेसला वर्षा गायकवाड यांना उभे करायचे होते. यावर संजय राऊत यांनी खेळी करत आपल्या ट्विटमध्ये १६ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. परंतु, ट्विटच्या कॅप्शनमध्ये त्यांनी मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघातून अनिल देसाई यांना उमेदवारी जाहीर झाल्याची घोषणा केली आहे. यामुळे आता काँग्रेसची अडचण होणार आहे.
ठाकरेंच्या शिवसेनेच्या वाट्याला २१ जागा सुटल्या असल्याची चर्चा आहे. यामुळे अजून ४ जागा जाहीर व्हायच्या बाकी आहेत. तर मविआसोबत आघाडी न झाल्याने उरलेल्या जागा, रासपला आणि राजू शेट्टींना देऊ केलेली जागा कोणाच्या पारड्यात जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या जागा काँग्रेसकडे जातात की शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे जातात, यावर पुढचे राजकारण अवलंबून आहे.